नाशिक | स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मभूमी असलेल्या भगूर शहराच्या विकासाला आधुनिकतेची जोड मिळणार आहे. भगूर नगर परिषदेच्या मालकीच्या जागांवर ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन, महिला कौशल्य विकास केंद्र, हिरकणी केंद्र, सार्वजनिक शौचालय, वॉटर एटीएम तसेच व्ह्यू पॉइंट आणि सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहेत. या विविध विकासकामांसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एकूण ९९ लाख ९९ हजार ८१६ रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या पुढाकारातून नगर परिषदेने सादर केलेल्या प्रस्तावाला ही मंजुरी देण्यात आली आहे.
ई-चार्जिंग स्टेशन आणि पर्यावरणपूरक उपक्रम
भगूर नगर परिषदेच्या नगर भूमापन क्रमांक ९८१ मधील मालकीच्या जागेवर ई-वाहन चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. यामुळे शहरात येणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना चार्जिंगची सुविधा उपलब्ध होईल. नियमानुसार शुल्क आकारून याद्वारे नगर परिषदेला नियमित उत्पन्न देखील मिळू शकणार आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
महिला सक्षमीकरण व पर्यटन विकासाची कामे
नगर भूमापन क्रमांक २३४/२ मधील जागेत महिला कौशल्य विकास केंद्र, हिरकणी केंद्र आणि सार्वजनिक शौचालय उभारण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्यविषयक सुविधांच्या अंतर्गत ४९ लाख ३१ हजार ३६७ रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. या केंद्रामुळे महिलांना कौशल्य विकासाच्या संधी मिळतील, तसेच स्तनदा मातांसाठी स्वतंत्र सुविधा व मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनासाठी आवश्यक सोयी उपलब्ध होतील. नागरिक आणि पर्यटकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी दत्तमंदिर चौक आणि शिवाजी चौक येथे वॉटर एटीएम उभारले जातील. पर्यावरण व पर्यटनविषयक कामांसाठी ५० लाख ६८ हजार ४४९ रुपयांची तरतूद करण्यात आली असून, क्रांती चौक येथे व्ह्यू पॉइंट आणि सेल्फी पॉइंट विकसित केला जाणार आहे.
Source: Cosmo News Desk






