मुंबई | मराठवाड्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून हा भाग दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. प्रकल्पाचा प्राथमिक प्रकल्प अहवाल तातडीने अपलोड करून केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाकडे पाठविण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील वर्षा शासकीय निवासस्थानी जायकाच्या वरिष्ठ शिष्टमंडळासमवेत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा आढावा घेण्यात आला. या बैठकीत महाराष्ट्र आणि जपान यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांवरही चर्चा झाली.
पहिल्या टप्प्यात चार जिल्ह्यांना लाभ
मराठवाड्यातील पाण्याचे असमान वितरण लक्षात घेता अतिरिक्त पाणीसाठा असलेल्या धरणांमधून दुष्काळी भागातील धरणांपर्यंत बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी पोहोचविण्यासाठी वॉटर ग्रीड प्रकल्प राबविला जात आहे. यासाठी दुहेरी प्रवाहाची व्यवस्था विकसित केली जाणार असून, पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या टप्प्यात जायकवाडी, माजलगाव, मांजरा, उजनी, निम्न तेरणा आणि निम्न मनार ही धरणे परस्परांना जोडली जाणार आहेत. अंदाजे ३ हजार ९५ किलोमीटर लांबीच्या मुख्य व दुय्यम पाइपलाइन आणि १५ जलशुद्धीकरण केंद्रांची उभारणी याद्वारे होणार असून, यामुळे सुमारे एक कोटी नागरिकांना थेट लाभ मिळणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटी, शेंद्रा-बिडकीन आणि वाळूज औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांनाही शाश्वत पाणीपुरवठा होण्यास मदत होईल.
जायकाकडून २० हजार कोटींचे अर्थसहाय्य
संपूर्ण आठ जिल्ह्यांतील वॉटर ग्रीड प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे २५ हजार ५६ कोटी रुपये असून, पहिल्या टप्प्यासाठी सुमारे २० हजार कोटी रुपयांचे कर्जसहाय्य देण्याबाबत जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीने (JICA) सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. लातूर आणि धाराशिव भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्याने प्रकल्पाच्या बांधकामात जपानी प्रगत भूकंपरोधक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यात डक्टाईल आयर्न पाइप्स, आधुनिक पंपिंग यंत्रणा आणि SCADA प्रणालीचा समावेश असेल. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करणे आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया जायकाच्या सहकार्याने तातडीने पूर्ण करून, २०२९ पर्यंत प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम पूर्णत्वास नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Source: Cosmo News Desk











