मुंबई | ग्रामीण भागातील पारंपरिक कौशल्ये, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि उद्योजकीय क्षमतेचा प्रभावी उपयोग करून रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने विकसित भारत २०४७ च्या संकल्पनेशी सुसंगत असा सर्वंकष विकास आराखडा तयार करावा, अशी सूचना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दिली आहे. लोकभवन येथे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने आयोजित ‘ग्रामोद्योग भरारी सन्मान पुरस्कार २०२५ व २०२६’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विविध जिल्ह्यांतील यशस्वी ग्रामोद्योग उद्योजकांचा गौरव करण्यात आला.
उद्योजकता आणि ‘मधाचे गाव’ उपक्रम
राज्यपालांनी सांगितले की, ग्रामीण उद्योजकांनी पारंपरिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उद्योगांचा विस्तार करावा. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पीएम विश्वकर्मा योजना आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासारख्या योजनांच्या माध्यमातून नवउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे. मंडळाच्या ‘मधाचे गाव’ उपक्रमाचे विशेष कौतुक करून त्यांनी महागाव आणि कडगावच्या धर्तीवर राज्यातील आणखी दहा गावांचा ‘मधाचे गाव’ म्हणून विकास करण्यात येत असल्याचे सांगितले. यासाठी शासनाने ५ कोटी २ लाख रुपयांची तरतूद केली आहे. मधमाशीपालन आणि मध उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.
पुरस्कारांची घोषणा व पुरस्कारप्राप्त उद्योजक
खादी व ग्रामोद्योग क्षेत्रातील उद्योजकांना अधिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी पुढील वर्षापासून ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कारां’च्या रोख पारितोषिकांच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली. मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी २०२३ पासून सुरू झालेल्या या पुरस्कार योजनेची माहिती दिली. २०२५ चे प्रथम क्रमांकाचे १५ हजार रुपयांचे पुरस्कार ठाण्याच्या रक्षा रमेश वागे यांना, द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपयांचे पुरस्कार रत्नागिरीचे संदेश परशुराम दळवी यांना आणि तृतीय क्रमांकाचे ७ हजार रुपयांचे पुरस्कार धुळ्याचे दर्शन गोपालदास यादव यांना प्रदान करण्यात आले. तसेच २०२६ चे प्रथम क्रमांकाचे १५ हजार रुपयांचे पुरस्कार अहिल्यानगरचे पारस दिलीप गोलेचा यांना, द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार पुण्याच्या तेजल अभिमन्यू नागवडे यांना आणि तृतीय क्रमांकाचे पुरस्कार सांगलीचे हर्षद नामदेव सुवर्णवंशी यांना प्रदान करण्यात आले. याशिवाय अनेक उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Source: Cosmo News Desk











