Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते १३ सेवाव्रतींचा सन्मान
Maharashtra

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते १३ सेवाव्रतींचा सन्मान

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना मान्यवर

मुंबई | राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १३ सेवाव्रतींना ‘वाग्धारा राष्ट्रसेवा सन्मान’ प्रदान करण्यात आला. अंधेरी, मुंबई येथील मुक्ती ऑडिटोरियम येथे या वाग्धारा उत्सव व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक गौर हरिदास, मॅगसेसे पुरस्कार विजेते मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वतवाणी आणि ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल नाडकर्णी यांच्यासह १३ मान्यवरांचा गौरव करण्यात आला. गेल्या चार दशकांत साहित्य, संस्कृती, कला, शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये वाग्धारा संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांचा सन्मान करून संस्था आदर्श निर्माण करत असल्याचे राज्यपाल म्हणाले.

भारताची सर्वात मोठी संपदा आणि भारतीय मूल्ये

समृद्ध सांस्कृतिक परंपरा, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक समरसता ही भारताची सर्वात मोठी संपदा असल्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी याप्रसंगी सांगितले. शांतता, सहअस्तित्व, सेवा आणि मानवकल्याण ही भारतीय मूल्ये आजच्या काळात अधिक महत्त्वाची ठरली आहेत. साहित्य समाजाला विचार देते, कला भावनांना अभिव्यक्ती देते, संगीत आत्म्याला स्पर्श करते, पत्रकारिता समाजाला जागृत करते आणि शिक्षण राष्ट्राची बौद्धिक शक्ती घडवते, असे नमूद करत या क्षेत्रांत योगदान देणारे लोक राष्ट्राची अमूल्य संपत्ती आहेत, असे ते म्हणाले. भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक असून, १५ ते ६५ वयोगटातील मोठी लोकसंख्या ही आपली खरी ताकद आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तरुण पिढी आणि उच्च शिक्षणाविषयी मार्गदर्शन

तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, संशोधन व नवोन्मेषाला प्रोत्साहन द्यावे आणि उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन राज्यपालांनी केले. मात्र असे करताना तरुणांनी आपली संस्कृती, संस्कार आणि राष्ट्राप्रति असलेली कर्तव्ये विसरू नयेत, असे त्यांनी सुचवले. विद्यापीठांचा कुलपती या नात्याने बोलताना त्यांनी उच्च शिक्षणात, विशेषतः ललित कला आणि प्रयोगात्मक कलांच्या अध्ययनाला अधिक महत्त्व दिले पाहिजे, असे सांगितले. कला या इतर शैक्षणिक विषयांच्या अध्ययनाला पूरक ठरतात, सर्जनशीलता विकसित करतात आणि विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, सहानुभूती व मानवी मूल्यांची जाणीव निर्माण करतात, असे ते म्हणाले. या पुरस्कार सोहळ्याला माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकर सिंह, शिक्षणतज्ज्ञ अजय कौल, ज्येष्ठ पत्रकार विमल मिश्र, निवड समितीचे अध्यक्ष जयंत देशमुख यांच्यासह वाग्धारा संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेल्या इतर व्यक्तींमध्ये अजय कौल, डॉ. प्रशांत नाथू, डॉ. सोनू जेसवानी, डॉ. संकेत पुजारा, संदीप पाटिल, सूर्यदत्त शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया, डॉ. सुप्रियो मुखर्जी, राजेश कुमार उपाध्याय, गायिका स्वाति मिश्रा आणि डॉ. शैलेश श्रीवास्तव यांचा समावेश होता.

Source: Cosmo News Desk

Related Posts