सातारा | दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याचे वाटप समन्यायी पद्धतीने करावे आणि कोणत्याही तालुक्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेत धरणांमधील पाणी प्राधान्याने पिण्यासाठी राखीव ठेवावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात धोम, बलकवडी, उरमोडी, कण्हेर व तारळी प्रकल्पांच्या रब्बी हंगाम सन २०२६-२७ च्या कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे आणि विश्वजित कदम दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे, आणि आमदार अरुण लाड, धैर्यशील कदम, महेश शिंदे, मनोज घोरपडे, डॉ. अतुल भोसले, सुहास बाबर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
पाणी वापराचे नियोजन आणि सूचना
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठकीत बोलताना पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने व योग्य नियोजनानुसार होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. जानेवारी महिन्यात उपलब्ध पाणीसाठ्याची सद्यस्थिती पाहून पाणी वाटपाचे नवे नियोजन करावे, जेणेकरून सर्व भागांना पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा समान फायदा मिळण्यास मदत होईल, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि तलावांमधील गाळ काढण्याचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे तसेच उपसा सिंचन योजनांची गळती काढण्याची कार्यवाही त्वरित हाती घेण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.
कोयना धरणातील वीस टक्के पाणी सिंचन आणि पिण्यासाठी राखीव ठेवण्यासह कोयना धरणातील पाणी वापराचे नियोजनाचे अधिकार सातारा जिल्हा कालवा सल्लागार समितीला प्रदान करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी कोयना धरणातील पाण्याचे नियोजन करण्याचे अधिकार सातारा कालवा समितीला देण्यात यावेत, असा ठराव मांडत हा ठराव शासनाकडे पाठवण्याची सूचना केली.
मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या सूचना
मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी बैठकीमध्ये खरिपाचे शिल्लक पाणी बलकवडीतून सोडावे, ज्यामुळे भाताच्या पिकाला फायदा होईल, अशी मागणी केली. उपसा सिंचन योजनांची वीज देयके शेतकऱ्यांकडून वसूल न करता ती दुष्काळ निधीमध्ये समायोजीत करण्यात यावीत, असे त्यांनी नमूद केले.
तसेच जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांची वीज खंडित करू नये, अशा महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी या बैठकीदरम्यान दिल्या आहेत. या सर्व बैठकीमध्ये दुष्काळ आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर पाणी व्यवस्थापनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली असून विविध उपाययोजना राबवण्याबाबत प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.
Source: Cosmo News Desk











