सातारा | सातारा जिल्ह्यातील काही कारखान्यांचे आणि सांगली जिल्ह्यातील काही कारखान्याचे कार्यक्षेत्र एकच असल्याने सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी अंतिम दर जाहीर केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील कारखान्याच्या बोर्ड मीटिंग होऊन अंतिम दर जाहीर केला जाईल, अशी चर्चा आज पार पडली. हा निर्णय जिल्ह्यातील ऊसदर प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीतील प्रमुख उपस्थिती
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार अतुल भोसले यांच्यासह जिल्ह्यातील कारखान्यांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि बँकेचे संचालक उपस्थित होते. बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व कारखान्यांसोबत ऊसदराच्या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
उसाच्या दराबाबत नवीन सूचना
साताऱ्यातील उसाचे दर ठरवताना सातारा जिल्ह्यामध्ये रिकव्हरी झोन दोन ठरवावेत, ज्यामध्ये 11 ते 12 टक्के आणि 12 टक्के पेक्षा जास्त रिकव्हरी असणारे असे दोन झोन ठरवावेत आणि त्यानुसार दर निश्चित करावेत, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी केल्या. पालकमंत्री यांच्या या सूचनांना बैठकीत उपस्थित सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
Source: Cosmo News Desk









