सांगली | स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत २५ ते ५० हजार लोकसंख्या असलेल्या स्वच्छ शहर गटात सांगली जिल्ह्यातील विटा नगरपरिषदेने देशभरातून पहिला क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल विटा येथे आयोजित सन्मान सोहळ्यात पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी विटा शहराच्या लौकिकात भर पडल्याचे गौरवोद्गार काढले. खुले सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमास आमदार सुहास बाबर, नगराध्यक्ष काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, पंचायत समिती सभापती सुवर्णा भोसले, आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील, ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रपती भवनात सन्मान आणि मंत्र्यांचे गौरवोद्गार
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ११ नोव्हेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विटा शहराचा सन्मान करण्यात आला. या यशामागे रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष काम करणारे आरोग्य सेवक, नगरपालिकेचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नियोजन आणि नागरिकांचे मोलाचे सहकार्य असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा सन्मान करणे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. विटा शहराने मिळवलेली ही कामगिरी इतर शहरांसाठी प्रेरणादायी ठरेल असे सांगत त्यांनी विकासकामांना शासनातर्फे पाठबळ मिळत राहील असे स्पष्ट केले. कार्यक्रमापूर्वी विटा नगरपरिषदेची विजयी मिरवणूक काढण्यात आली.
कचरा व्यवस्थापन आणि लोकसहभाग
विटा नगरपरिषदेने स्वच्छतेला नागरिकांच्या आरोग्याचा केंद्रबिंदू बनवले आहे. प्रत्येक घरातून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करणे, त्याचे वर्गीकरण, वाहतूक आणि शास्त्रोक्त व्यवस्थापन प्रभावीपणे राबवले जाते. प्लास्टिकमुक्त शहर निर्माण करण्यासाठी आणि ३R संकल्पनेच्या माध्यमातून कचऱ्याचे प्रमाण कमी करून पर्यावरण संवर्धनाला चालना दिली जात आहे. हा सत्कार सोहळा विटा शहराला स्वच्छ ठेवणाऱ्या माता-भगिनींचा व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा असल्याचे आमदार सुहास बाबर यांनी सांगितले. तसेच विटेकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन नळ कनेक्शन आणि जलशुद्धीकरण योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रास्ताविक आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे यांनी, सूत्रसंचालन नितीन चंदनशिवे यांनी तर आभार मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी मानले.
Source: Cosmo News Desk











