अमरावती | कुमकुम मोहोड आणि यशदीप भोगे या धनुर्धरांसह भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू भारती फुलमाळी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत केलेल्या उच्च दर्जाच्या कामगिरीमुळे अमरावती जिल्ह्याला जागतिक बहुमान मिळाला आहे. स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेच्या धनुर्विद्या मैदानाहूनही अशाच प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव झळकवणारे खेळाडू तयार होतील, असा विश्वास महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. त्यांनी आंतरराष्ट्रीय धनुर्धर कुमकुम मोहोड यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
धनुर्विद्या मैदानाचे उद्घाटन आणि खेळाडूंचा सत्कार
निंभोरा खुर्द भागातील स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये नव्याने निर्मित धनुर्विद्या मैदानाचे उद्घाटन पालकमंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी शाळेच्या प्रशिक्षित तिरंदाज विद्यार्थ्यांनी नेम धरला आणि फित कापून मैदानाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसळ, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, अग्निहोत्री गृप ऑफ इन्स्टिट्यूटचे सचिव सचिन अग्निहोत्री आणि शाळेचे मुख्याध्यापक एन. संतोष कुमार उपस्थित होते. शालेय स्तरावर उत्तमोत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्यामुळे क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी नवीन दालने उघडतात, असे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. शाळेचे माजी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय धनुर्धर यशदीप भोगे यांचे प्रशिक्षक गणेश विश्वकर्मा यांच्या उपस्थितीत यशदीप यांचे वडील संजय भोगे यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्याध्यापक एन. संतोष कुमार यांनी स्वागतपर भाषण केले तर सचिन अग्निहोत्री यांनी प्रास्ताविक केले.
आंतरराष्ट्रीय धनुर्धर कुमकुम मोहोड यांच्या घरी सत्कार
जपान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या धनुर्धर कुमकुम मोहोड यांच्या साई नगर परिसरातील गोसावी कॉलनी येथील घरी जाऊन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसळ, प्रवीण तायडे, राजेश वानखडे यांच्यासह कुमकुम यांचे वडील अनिल मोहोड, आई रुपाली मोहोड आणि कुटुंबीय उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी कुमकुम यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारत त्यांच्या तिरंदाजीतील प्रवासाची आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील यशाची माहिती जाणून घेतली. ऑलिम्पिक स्पर्धेतही कुमकुम यांनी यश मिळवून देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Source: Cosmo News Desk











