मुंबई | ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासाला गती देण्यासाठी आगामी पुरवणी मागण्यांमध्ये ६ हजार ८४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली आहे. महसूल मंत्री तथा ओबीसी संदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ओबीसी समाजाच्या शैक्षणिक सुविधा, भटक्या-विमुक्त समाजाचे प्रश्न, घरकुल योजना तसेच विविध समाजघटकांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे, ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार आणि बहुजन कल्याण विभागाचे सचिव अप्पासाहेब धुळाज यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात उपसमितीला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त विभागांवतर्फे विविध उपक्रम राबवण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली. धनगर, वाडी, कोळी यांसह भटक्या-विमुक्त समाजातील विविध घटकांच्या मागण्यांवर देखील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून त्यांना घरे, वसाहती आणि जागा उपलब्ध करून देण्याबाबत विचार करण्यात आला आहे.
वसतिगृहांचे बांधकाम आणि नियोजन
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात १०० विद्यार्थ्यांच्या आणि विभागीय स्तरावर २५० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची वसतिगृहे उभारली जाणार आहेत. ही वसतिगृहे उभारण्यासाठी महसूल विभागाच्या अखत्यारीतील जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या वसतिगृहांचे डिझाइन तयार करण्यात येत असून, आगामी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत त्याला अंतिम मान्यता दिली जाईल. त्यानंतर मार्च महिन्यापासून या वसतिगृहांच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचे नियोजन शासनस्तरावर करण्यात आले आहे. दरम्यान, वसतिगृहांच्या इमारतींचे बांधकाम करताना पर्यावरणपूरक बाबींना प्राधान्य दिले जावे आणि इमारतींमध्ये सौरऊर्जेचा वापर करण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी महत्त्वाची सूचना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या बैठकीत केली.
भटक्या समाजासाठी विशेष शिबिरे
भटक्या-विमुक्त आणि घुमंतू समाजातील नागरिकांना मूलभूत शासकीय कागदपत्रे मिळविताना उद्भवणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ६, ७ आणि ८ जानेवारी रोजी राज्यभरात सुमारे ५०० विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. या शिबिरांच्या माध्यमातून व्हीजेएनटी प्रवर्गातील जातींच्या नागरिकांना जन्मदाखले, आधारकार्ड आणि इतर आवश्यक ओळखपत्रे उपलब्ध करून देण्याचे मुख्य उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. राज्यातील कोणताही भटक्या-विमुक्त किंवा घुमंतू समाजातील नागरिक आवश्यक कागदपत्रे किंवा ओळखपत्रांपासून वंचित राहू नये, यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांनी आपापसात समन्वय साधून पात्र नागरिकांना त्यांच्या हक्काची कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशा स्पष्ट सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. तसेच, ओबीसी समाजाचे शासकीय नोकऱ्यांमधील प्रतिनिधित्व किती आहे, याची अचूक आणि वस्तुनिष्ठ आकडेवारी सांख्यिकी विभागाने संकलित करावी, अशी सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
Source: Cosmo News Desk










