मुंबई | पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार डिजिटल अध्ययन साहित्य उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या रोजगार क्षमतेला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंडळाच्या के-स्किम अंतर्गत अभ्यासक्रमांसाठी ई-कंटेंट निर्मिती करण्याकरिता उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक स्टुडिओचे आणि शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई येथील बहुउद्देशीय संगणक केंद्राचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ई-कंटेंट आणि डिजिटल अध्ययन साहित्याची निर्मिती
पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विषयातील संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, स्वयंअध्ययन करता यावे आणि परीक्षेची प्रभावी तयारी करणे सुलभ व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने के-स्किम अंतर्गत निवडक विषयांसाठी व्हिडिओ व्याख्याने व डिजिटल अध्ययन साहित्य तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत ई-ट्युटोरियल्स, द्विभाषिक ई-कंटेंट, प्रयोगशाळा हस्तपुस्तिका, व्हिडिओ व्याख्याने, सादरीकरणे तसेच मार्गदर्शक वाचन साहित्य टप्प्याटप्प्याने तयार केले जाणार आहे. या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गातील अध्यापन समजून घेणे, उजळणी करणे आणि परीक्षेची तयारी करणे अधिक सोपे होणार आहे.
अत्याधुनिक सुविधा आणि उपસ્થित मान्यवर
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत त्यांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे बहुउद्देशीय संगणक केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक व शैक्षणिक कौशल्ये आत्मसात करण्यास मदत मिळणार आहे. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी तंत्र शिक्षण संचालनालय तथा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अमोल मुत्याल, मंडळाचे सचिव डॉ. मारुती जाधव यांच्यासह विभागातील व मंडळातील इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.
Source: Cosmo News Desk








