मुंबई | विकसित महाराष्ट्र–२०४७ या संकल्पनेअंतर्गत महाराष्ट्राला जागतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने राज्यात १०० पर्यटन सबसर्किट तयार करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. प्रस्तावित पर्यटन सबसर्किटची अंतिम यादी तयार करण्यापूर्वी पर्यटन क्षेत्रातील विविध भागधारकांचे अभिप्राय आणि सूचना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र शासन पर्यटन विभागाच्या वतीने पर्यटन संचालनालयाच्या कार्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पर्यटन व्यावसायिक, संस्था आणि प्रतिनिधींनी प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेतला. बैठकीमध्ये प्रस्तावित पर्यटन सबसर्किटची निवड, भौगोलिक व विषयाधारित वर्गीकरण, विकासाची शक्यता, पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि स्थान स्तरावर पर्यटनाला चालना देण्याच्या उपायांवर सविस्तर चर्चा झाली. उपस्थितांनी आपापल्या भागातील पर्यटन वैशिष्ट्ये आणि विकासासाठी आवश्यक शिफारसी मांडल्या.
भागधारकांच्या सूचनांचा अंतिम आराखड्यात समावेश
पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांनी सांगितले की, विकसित महाराष्ट्र–२०४७ अंतर्गत पर्यटन क्षेत्राला आर्थिक व सामाजिक विकासाचे साधन मानले गेले आहे. राज्याची भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक आणि साहसी वैशिष्ट्ये लक्षात घेऊन १०० सबसर्किटचे नियोजन आहे. या उपक्रमात भागधारकांचा अनुभव अत्यंत महत्त्वाचा असून, प्राप्त झालेल्या सूचनांनुसार अंतिम यादी अधिक व्यापक व समतोल बनवली जाईल.
या बैठकीत आलेल्या सर्व सूचनांचे संकलन व परीक्षण करून अंतिम आराखडा तयार केला जाणार आहे. या उपक्रमामुळे राज्यातील पर्यटनस्थळांचा नियोजनबद्ध विकास होईल, पायाभूत सुविधा बळकट होण्यासोबतच पर्यटकांचा अनुभव समृद्ध होईल. तसेच स्थानिक समुदायांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Source: Cosmo News Desk











