नाशिक | आगामी सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने शनिवारी (दि. ३१) रामतीर्थ येथे गोदापूजन आणि जनजातीय सिंहस्थ महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विविध समाजघटकांतील महिला पुरोहित गोदावरी मातेच्या पूजनविधीचे नेतृत्व करणार आहेत.
महिलांकडे महत्त्वाची जबाबदारी
या सोहळ्यात धार्मिक विधीचे निवेदन, पूजनविधीचे मार्गदर्शन आणि महाआरतीचे संचालन अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या महिला पार पाडणार आहेत. धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महिलांना सन्मानाचे स्थान देण्याबरोबरच त्यांच्या ज्ञान, साधना आणि नेतृत्वक्षमतेचा गौरव करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्त्रीशक्तीचा सन्मान, समानतेची भावना आणि सर्व समाजघटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. श्रद्धा आणि सेवाभावाच्या बळावर महिला धार्मिक परंपरांचे जतन व संवर्धन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, ही भावना या आयोजनातून अधोरेखित होणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती आणि जनजातीय सहभाग
या सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य, तेरा आखाड्यांतील संत-महंत, जगद्गुरू, शंकराचार्य आणि विविध आध्यात्मिक परंपरांतील मान्यवर सहभागी होणार आहेत. जनजातीय बांधवांचा सन्मानपूर्ण सहभाग हे या महाआरतीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. जनजातीय समाजाचे निसर्ग, जलस्रोत आणि पर्यावरणाशी असलेले नाते लक्षात घेऊन त्यांच्या सांस्कृतिक परंपरांचा गौरव करण्यात येणार आहे. गोदापूजन आणि महाआरतीच्या माध्यमातून भाविकांमध्ये पर्यावरणसंवर्धन व जलसंवर्धनाबाबत जनजागृती केली जाणार आहे. यावेळी जयंत गायधनी, मुकुंद खोचे, नरसिंहकृपा प्रभू, भक्तिचरणदास महाराज, धनंजय बेळे, चिराग पाटील, शिवाजी बोंदार्डे, राजेंद्र फड, आशिमा केला, अभय नेरकर उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk








