Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • कोल्हापुरात वीस दिवसांत ४५० वनराई बंधारे उभारले
Maharashtra

कोल्हापुरात वीस दिवसांत ४५० वनराई बंधारे उभारले

कोल्हापूर वनक्षेत्रात लोकसहभागातून उभारलेले वनराई बंधारे

कोल्हापूर | कोल्हापूर वन विभागाने गेल्या वीस दिवसांत लोकसहभागातून वनक्षेत्रात ४५० वनराई बंधारे उभारले आहेत. या उपक्रमामुळे सुमारे तीन कोटी लीटर पाणीसाठा निर्माण झाला असून, एकूण एक हजार बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कोल्हापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या जलसंवर्धनाच्या उपायांच्या आव्हानाला प्रतिसाद देत २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती आणि वन्यजीव सप्ताहाच्या प्रारंभाच्या दिवशी या अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. या मोहिमेत ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला तसेच वन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. श्रमदान आणि लोकसहभागाच्या माध्यमातून अतिशय कमी खर्चात हे बंधारे बांधण्यात आले आहेत.

पाणीसाठा आणि मृदसंधारणाचे फायदे

वनक्षेत्रात बांधलेल्या या बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरण्यास मोठी मदत होत आहे. यामुळे भूजल पातळी वाढण्यास तसेच परिसरातील विहिरी आणि जलस्रोतांमधील पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास हातभार लागत आहे. याशिवाय, पाण्याचा प्रवाह नियंत्रित होऊन मातीची धूप कमी होते आणि मृदसंधारणाचे कार्य साध्य होते. जंगलामध्ये वन्यप्राण्यांसाठी पाण्याचे स्रोत निर्माण झाल्यामुळे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची गरज जंगलातच भागवली जात आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष होणार कमी

जंगलात पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे येत नाहीत, ज्यामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी होण्यास मदत मिळत आहे. वनक्षेत्रातील आर्द्रता टिकवून ठेवणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे आणि परिसंस्थेचा समतोल राखणे या दृष्टीने हे अभियान महत्त्वाचे ठरले आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या सूचनांनुसार तसेच मुख्य वनसंरक्षक ए. लक्ष्मी आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts