Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • व्यसनमुक्त भारतासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
Nashik

व्यसनमुक्त भारतासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

नाशिक | मराठा विद्याप्रसारक समाज आणि एस. जे. ए. ॲनालिटिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास कलामंदिरात ‘सशक्त युवा, सशक्त भारत’ अभियानांतर्गत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवकांनी व्यसनांपासून दूर राहण्यावर भर दिला. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यपाल महोदयांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, न्या. दिलीप घुमरे, न्या. मदन गोसावी, ॲड. महेश सावंत, आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात करताना राज्यपालांनी उपस्थितांना व्यसनमुक्त राहण्याची शपथ दिली.

युवकांची शक्ती आणि शिक्षणाचा खरा उद्देश

देशातील सुमारे ६५ टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षांखालील असून, भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे, असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी नमूद केले. युवकांची ही अमूल्य संपत्ती विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी महत्त्वाची ठरेल. शिक्षणातून केवळ पदव्या न मिळवता विवेक, शिस्त, चांगल्या सवयी आणि चारित्र्य घडवले पाहिजे, असे सांगत त्यांनी अमली पदार्थांच्या व्यसनामुळे एकाग्रता कशी कमी होते आणि यशाच्या मार्गात कसे अडथळे येतात, याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पालकांच्या कष्टांचा आणि त्यागाचा सन्मान करत विद्यार्थ्यांनी चुकीच्या संगतीपासून आणि व्यसनांच्या प्रलोभनापासून दूर राहिले पाहिजे. व्यसनाधीनतेमुळे केवळ व्यक्तीचे आयुष्यच नव्हे तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी मित्रांच्या दबावाला बळी न पडता व्यसनांना ठामपणे नकार दिला पाहिजे.

राष्ट्रनिर्मिती आणि मान्यवरांचा सत्कार

प्रत्येक नागरिकाच्या योगदानाबाट राष्ट्रनिर्मिती होत असून युवकांनी आपल्या कार्याची एक वीट विकसित भारताच्या पायात रचली पाहिजे, असे आवाहन राज्यपालांनी केले. घेतलेली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा आयुष्यभर पाळत समाजात जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमादरम्यान पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आंतरराष्ट्रीय खेळाडू दिलीप गावित, सर्वेश कुशारे, ॲड. जयंत जायभावे, माजी आमदार निशिगंधा मोगल, डॉ. हिरालाल पवार, मिलिंद जोशी आणि शिवम यादव यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. महेश सावंत यांनी केले, सूत्रसंचालन स्वाती पवार यांनी पार पाडले तर आभार प्रदर्शन माजी आमदार जयंत जाधव यांनी केले. या सोहळ्यात विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रत्यक्ष व दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

Source: Cosmo News Desk

Related Posts