नाशिक | अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात पर्यावरणाचा बोजवारा उडवणारा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका बाजूला शासकीय पातळीवर वृक्षारोपणासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण केली जात असून, नागरिकांना ‘एक झाड लावा’ असा संदेश देणारे आकर्षक फलक लावले जात आहेत. मात्र, दुसरीकडे सामान्य जनतेला पर्यावरणाचे धडे देणाऱ्या याच वनविभागाच्या कार्यालयात भ्रष्ट अधिकारी आणि लाचखोरांच्या संगनमताने हजारो झाडांची बेसुमार व बेकायदेशीर कत्तल करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
कारवाईचा केवळ फार्स आणि गोपनीयता
हा गंभीर प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर वनविभागाच्या वर्तुळात खळबळ उडाली आणि प्रशासनाकडून चौकशीचे आदेश दिल्याचा आव आणण्यात आला. परंतु, या घटनेला तब्बल १० दिवस उलटून गेले तरी दोषी अधिकाऱ्यांवर नेमकी कायदेशीर कारवाई काय झाली, याबाबत वनविभागाकडून पूर्णपणे गोपनीयता पाळली जात आहे. प्रसारमाध्यमे आणि पर्यावरणप्रेमींनी विचारणा करूनही अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत. वृक्षतोड करणाऱ्या तस्कर व लाचखोरांकडून मलिदा लाटण्यात आल्यामुळेच या प्रकरणावर पडदा टाकण्याचा डाव रचला जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
पर्यावरणप्रेमींचा आक्रमक पवित्रा आणि कारवाईची मागणी
शासकीय रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा दाद मागितली कुणाकडे, असा संतप्त सवाल शेवगाव तालुक्यातून विचारला जात आहे. वरिष्ठ पातळीवरील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. निसर्गाची ही लूट पाहता, केवळ खानापूर्तीच्या कारवाईवर न थांबता दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी आक्रमक मागणी पर्यावरणप्रेमींकडून जोर धरत आहे. आता याप्रकरणी मुख्य वनसंरक्षक आणि जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Source: Cosmo News Desk







