मुंबई | केंद्र पुरस्कृत ‘उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यभरात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (एफएलएनएटी) घेण्यात आली. या परीक्षेमध्ये सुमारे सात लाख परीक्षार्थी सहभागी झाले असल्याची माहिती शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे. ही परीक्षा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार असाक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमाचा एक भाग आहे.
उत्तीर्ण परीक्षार्थींसाठी प्रमाणपत्र आणि पुढील शिक्षणाची संधी
या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून प्रमाणपत्र आणि गुणपत्रक प्रदान केले जाणार आहे. तसेच या नवसाक्षरांना पुढील शिक्षणासाठी इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी, दहावी आणि बारावीच्या परीक्षांना बसण्याची संधी मिळणार आहे. उल्लास ॲपवर नोंदणी झालेल्या परीक्षार्थ्यांसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील यू-डायस प्राप्त शाळांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि बंगाली अशा एकूण नऊ माध्यमांतून पार पडली.
जीवनकौशल्ये विकसित होणार आणि परीक्षा केंद्रांची पाहणी
या मूल्यमापन चाचणीमुळे आर्थिक व कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्यविषयक जागरूकता, बालसंगोपन, शिक्षण आणि कुटुंबकल्याणाशी संबंधित जीवनकौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजीत सिंह देओल आणि आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविला जात आहे. परीक्षेच्या दिवशी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षणाधिकारी, प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. तसेच शिक्षक संघटना, शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी परीक्षेचे योग्य नियोजन करून ही प्रक्रिया पूर्ण केली.
Source: Cosmo News Desk







