नाशिक | आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे पार पडणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यांसाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे सोहळे सुरळीत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. प्राधिकरणाच्या समिती सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत पास व्यवस्थापन, आसनव्यवस्था, वाहतूक, पार्किंग तसेच प्रवेश व निर्गमन मार्गांचे अचूक नियोजन करण्यावर भर देण्यात आला. या बैठकीस महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पास व आसनव्यवस्थेचे नियोजन
ध्वजारोहण सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर मान्यवर, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी पास वितरणाचे नियोजन केले जाणार आहे. विभागनिहाय आसनव्यवस्था निश्चित करून प्रभावी प्रवेश यंत्रणा उभारण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांनी उपस्थितीचा आढावा घेऊन आसनव्यवस्थेचा आराखडा तयार करावा आणि त्याची माहिती संबंधित कार्यालयांना द्यावी, असे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले. गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी प्रवेशद्वारे, निर्गमन मार्ग, बॅरिकेडिंग आणि मान्यवरांच्या हालचालींचे योग्य नियोजन करण्याचे ठरविण्यात आले. मुख्य मंचासमोरील जागा मोकळी ठेवणे तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
वाहतूक, पार्किंग आणि गोदाआरती व्यवस्थापन
कार्यक्रमाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि उपस्थितांना सुलभता राहावी यासाठी स्वतंत्र वाहतूक व पार्किंग आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासकीय कार्यालयांच्या समन्वयाने सामूहिक बससेवेचा पर्याय विचारात घेण्यास सांगण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीचे नियोजन करताना वाहनतळ, बस उतरण्याची ठिकाणे आणि प्रवेशमार्गांचा नकाशा तयार करावा. तसेच नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी दिशादर्शक फलक आणि अॅनिमेटेड व्हिडिओ तयार करण्याबाबत चर्चा झाली. रामकुंड येथे सायंकाळी होणाऱ्या गोदाआरतीच्या वेळी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन स्वतंत्र व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. यामध्ये येण्या-जाण्याचे मार्ग, बॅरिकेडिंग, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन मार्ग खुले ठेवण्यास प्राधान्य देण्याचे सांगण्यात आले आहे.
Source: Cosmo News Desk







