Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • मुंबईतील समूह पुनर्विकासाचे प्रस्ताव गतीने मार्गी लावा: सचिन अहिर
Maharashtra

मुंबईतील समूह पुनर्विकासाचे प्रस्ताव गतीने मार्गी लावा: सचिन अहिर

मुंबईतील इमारतींच्या समूह पुनर्विकासाच्या बैठकीत चर्चा करताना अधिकारी व पदाधिकारी

मुंबई | रहिवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार निवास उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईतील जुन्या इमारतींच्या समूह पुनर्विकासाच्या प्रस्तावांचा विस्तृत आढावा विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी घेतला. रहिवाशांचे व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून हे सर्व प्रस्ताव गतीने मार्गी लावावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत.

विविध भागांतील प्रस्तावांवर सविस्तर चर्चा

विधानभवन येथे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मुंबईतील विविध भागांतील इमारतींच्या समूह पुनर्विकासाच्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये पिंपळेश्वर, इराणी चाळ, वाणी चाळ, सातरस्ता-जेकब सर्कल आणि धोबी घाट परिसरातील विविध इमारतींचा समावेश होता. याशिवाय उमरखाडीतील म्हाडाच्या ८१ इमारती आणि परिसरातील खासगी इमारती तसेच परळ-प्रभादेवी येथील जगन्नाथ भाटणकर मार्गावरील रस्तारुंदीमुळे बाधित झालेल्या १९ इमारतींच्या समूह पुनर्विकासाच्या प्रस्तावांवरही तपशीलवार चर्चा करण्यात आली.

सातरस्ता-जेकब सर्कल परिसरातील विठ्ठल निवास, लक्ष्मीपती बिल्डिंग, म्हाडा, मस्जिद चाळ, रंगवाला बिल्डिंग, झोयेब हाऊस, इस्लामिक बिल्डिंग, वसंत भवन लॉज, साई सागर, आगाखान बिल्डिंग व तयब बिल्डिंग यांसारख्या इमारतींच्या समूह पुनर्विकासाच्या अनुषंगानेही बैठकीत चर्चा करण्यात आली. या परिसरातील पुनर्विकासाचे प्रस्ताव पुढे नेण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधण्याचे निर्देश उपसभापतींनी दिले.

रहिवाशांच्या अडीअडचणींची घेतली दखल

या बैठकीदरम्यान संबंधित इमारतींच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी आणि रहिवाशांशी उपसभापती अहिर यांनी संवाद साधला. इमारतींचे रहिवासी व पदाधिकाऱ्यांनी पुनर्विकासासंदर्भातील आपल्या अपेक्षा, अडचणी आणि विविध प्रश्न यावेळी मांडले. उपसभापतींनी रहिवाशांचे व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्याचबरोबर म्हाडा तसेच अन्य संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बाजूही जाणून घेतली. उमरखाडीतील म्हाडाच्या इमारतींच्या संदर्भात उमरखाडी पुनर्वसन समितीच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या मुद्द्यांची विशेष दखल घेण्यात आली.

विविध भागांतील पुनर्विकासाचे प्रस्ताव मार्गी लावत असताना रहिवाशांचे हित, संबंधित विभागांच्या भूमिका आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाही यांचा समन्वय साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत उपसभापतींनी व्यक्त केले. या बैठकीस म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, एमएमआरडीए तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि समूह पुनर्विकासासाठी प्रस्तावित इमारतींचे रहिवासी व पदाधिकारी उपस्थित होते.

Source: Cosmo News Desk

Related Posts