मुंबई | लोकमान्य नगर, दादर येथील प्रियदर्शनी सोसायटी आणि प्रभादेवी येथील वाकडी चाळ सोसायटीच्या पुनर्विकासातील अडचणी दूर करून या प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले आहेत. मंत्रालयात पार पडलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी या दोन्ही महत्त्वाच्या पुनर्विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या.
प्रियदर्शनी सोसायटीच्या पुनर्विकासाबाबत म्हाडाला निर्देश
बैठकीदरम्यान प्रियदर्शनी सोसायटीच्या पुनर्विकासाचा मुद्दा सविस्तर चर्चिला गेला. विकासक आणि स्थानिक रहिवाशांमध्ये झालेल्या करारातील सर्व अटी व मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करून, म्हाडाने आपल्या स्तरावर तातडीने आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
वाकडी चाळ प्रकल्पासाठी समन्वय साधण्याचे आवाहन
प्रभादेवी येथील वाकडी चाळ सोसायटीच्या पुनर्विकासाबाबत बोलताना, विकासक आणि रहिवासी यांच्यात योग्य समन्वय घडवून आणून पुनर्विकासाची कार्यवाही पुढे नेण्यात यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. या बैठकीला गृहनिर्माण विभागाच्या सहसचिव विद्या हम्पय्या, निवासी मुख्य अभियंता रूपेश राऊत, म्हाडाचे कार्यकारी अभियंता रामटेके यांच्यासह संबंधित सोसायट्यांचे प्रतिनिधी आणि विकासक उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk







