मुंबई | सुरीनाम देशाच्या भारतातील राजदूत हनीषा जयराम यांनी मुंबई येथील महाराष्ट्र विधिमंडळाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही देशांमधील राजनैतिक आणि व्यावसायिक संबंधांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
व्यापार वृद्धीबाबत चर्चा आणि सभागृह भेट
सुरीनाममध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या लक्षणीय असून दोन्ही देशांचे संबंध दृढ व मैत्रीपूर्ण आहेत. सुरीनाममध्ये ५१ प्रतिनिधींचे सभागृह आणि १७ मंत्रिमंडळ सदस्य आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने विविध क्षेत्रांतील व्यापार आणखी वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे हनीषा जयराम यांनी सांगितले. राजदूत जयराम यांनी महाराष्ट्र विधानसभेला आणि विधानपरिषदेला भेट दिली.
उपसभापती सचिन अहिर यांच्याकडून सदिच्छा
भारत आणि सुरीनाम या दोन्ही देशांमधील व्यापार आणि मैत्रीपूर्ण संबंध आणखी वृद्धिंगत व्हावेत, अशी सदिच्छा यावेळी उपसभापती सचिन अहिर यांनी व्यक्त केली. या बैठकीला आणि भेटीप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव-२ श्रीमती मेघना तळेकर-इटकेलवार, सचिव-३ डॉ. विलास आठवले, सचिव-४ श्री. शिवदर्शन साठ्ये आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापतींचे सचिव पंडित खेडकर उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk







