नवी दिल्ली | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपती भवन येथे भेट देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे औपचारिक निमंत्रण दिले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी हा ध्वजारोहण सोहळा आयोजित केला जाणार आहे. या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपतींना या सोहळ्यासोबतच गोदा आरती, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे उदघाटन, कुंभमेळा गीताचे लोकार्पण, कॉफीटेबल बूक आणि कुंभमेळा टपाल तिकिटाच्या अनावरणासाठी देखील आमंत्रित करण्यात आले आहे. याप्रसंगी मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादाजी भुसे, नरहरी झिरवाळ, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, विवेक सोनुणे, चंद्रशेखर पंचाक्षरी, मनोज थेटे, नरसिंहकृपा दास, डॉ. प्रवीण गेडाम आणि शेखर सिंह उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण भेटवस्तू आणि निमंत्रण पत्रिका
राष्ट्रपतींना देण्यात आलेले निमंत्रण एका वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक संकल्पनेवर आधारित आहे. निमंत्रण पेटी उघडताच कुंभमेळ्याची पौराणिक पार्श्वभूमी, आध्यात्मिक महात्म्य आणि भव्यता दर्शविणारी त्रिमितीय कलाकृती उलगडते. या भेटीदरम्यान महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेपासून आदिवासी उद्योजकता, वस्त्रकला, कृषिसमृद्धी आणि खाद्यसंस्कृतीपर्यंतच्या वैविध्यपूर्ण वारशाची ओळख करून देणारा विशेष भेटवस्तू संचही राष्ट्रपतींना प्रदान करण्यात आला. यात पंचेंद्रियांशी संबंधित अनुभवांचा समावेश असलेल्या संकल्पनेतून नाशिकचा सांस्कृतिक वारसा आणि पवित्र गोदावरीचा महिमा अधोरेखित करण्यात आला आहे.
आदिवासी उत्पादने व वस्त्रपरंपरेचा समावेश
भेटवस्तू संचामध्ये आदिवासी विकास विभागांतर्गत शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. यात अगरबत्ती, भरडधान्यांचे खाद्यपदार्थ, मोहफुलांची उत्पादने, बांबूच्या वस्तू आणि वनमध यांचा समावेश असून याद्वारे आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान व स्थानिक उद्योजकतेचे सामर्थ्य समोर येते. तसेच महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचा मानबिंदू असलेली येवला येथील पैठणी, नाशिकच्या कृषिसमृद्धीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काळ्या मनुका, काजू, खाद्यपरंपरेचे प्रतीक असलेला चिवडा तसेच निवडक मिठाई आणि सुकामेव्याच्या पदार्थांचा या भेटवस्तू संचात समावेश करण्यात आला आहे.
Source: Cosmo News Desk










