नाशिक | आपल्या घराण्याचा गौरवशाली सांगीतिक वारसा चौथ्या पिढीतही अत्यंत समर्थपणे पुढे नेण्याचे काम नाशिकच्या दसककर भगिनींनी केले आहे. अश्विनी, ईश्वरी, गौरी आणि सुरश्री या चारही कन्यांनी आपल्या स्वरांच्या जादूने केवळ भारतातच नव्हे, तर सातासमुद्रापार आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया आणि आधुनिक प्रयोगांची जोड देत या भगिनींनी स्वरांच्या दुनियेत स्वतःचा ठसा उमटवला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ‘असा बेभान हा वारा’ या गीतासाठी त्यांना दिलेले आशीर्वाद ही त्यांच्यासाठी मोठी पावती ठरली आहे. संगीतातील दिग्गजांनीही त्यांच्या या अभिनव सांगीतिक प्रयोगांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
शास्त्रीय शिक्षणाची भक्कम शिदोरी
दसककर भगिनींना संगीताचे प्राथमिक धडे घरातूनच मिळाले. त्यांचे आजोबा पंडित प्रभाकर दसककर, वडील प्रख्यात संवादिनी वादक व गायक पंडित सुभाष दसककर आणि काका माधव दसककर यांच्याकडे त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली, जी आजही अविरतपणे सुरू आहे. त्यांनी जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका पंडिता मंजिरी असनारे केळकर यांच्याकडे संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. त्यानंतर जयपूर, किराणा व ग्वाल्हेर या तीनही घराण्यांच्या गायकीचा वारसा असलेल्या पंडिता विदुषी अलका देव मारुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समग्र गायकीचे शिक्षण घेत आपल्या सुरांचा पाया अधिक भक्कम केला. या सखोल अभ्यासामुळेच त्यांना संगीतातील विविध प्रकार हाताळणे सोपे झाले आहे.
अभिनव प्रयोगांना दिग्गजांची दाद
सोशल मीडियाच्या माध्यमातून दसककर भगिनींची कला जगभरातील चोखंदळ रसिकांपर्यंत पोहोचली आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ हे गाणे हार्मनी प्रकारात सादर केले होते, ज्याला लाखो रसिकांनी पसंती दिली. ‘स्मृतिगंध’ या जागतिक पेजवरून त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यांना एक नवीन ओळख मिळाली. टर्कीश मार्च आणि फॉर एलिस यांसारख्या पाश्चिमात्य सिंफनींमध्ये भारतीय शास्त्रीय संगीतातील तराणा, सरगम आणि तबल्याचे बोल वापरून त्यांनी केलेले गायन रसिकांना विशेष भावले. वडील पंडित सुभाष दसककर यांच्यामुळे त्यांना बालपणापासूनच पाश्चिमात्य संगीताची गोडी लागली होती, ज्यातून त्यांनी ‘व्होकल हार्मनी’चा प्रयोग यशस्वी केला. सुरुवातीला गाण्याच्या शब्दांवर प्रयोग केल्यानंतर, आवाजाचे वेगवेगळे टोन वापरून त्यांनी केलेल्या सादरीकरणाला मोठी दाद मिळाली.
या भगिनींच्या कलेचे कौतुक संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी केले आहे. यामध्ये पद्मभूषण पंडित राजन-साजन मिश्रा, पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पंडित विश्वमोहन भट, पंडित रोणू मुजुमदार आणि शौनक अभिषेकी यांसारख्या अनेक महान कलाकारांचा समावेश आहे. विशेषतः पंडित राजन मिश्रा यांनी भारतीय संगीतात असा प्रयोग यापूर्वी झाला नसावा, अशा शब्दांत त्यांचे कौतुक करत त्यांना स्वतंत्र कार्यक्रम सादर करण्याचे प्रोत्साहन दिले. घराण्यातील हसत-खेळत सुरू झालेला हा हार्मनी संगीताचा प्रवास आज जागतिक स्तरावर नावाजला जात आहे.
Source: Cosmo News Desk






