Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन
Maharashtra

जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन

जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज सादर करतानाची संगणक स्क्रीन

मुंबई | जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया राज्य शासनाकडून अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ऑनलाइन करण्यात आली आहे. यापुढे या प्रमाणपत्रासाठीचे सर्व अर्ज केवळ ‘सीसीव्हीआयएस’ प्रणालीद्वारेच स्वीकारले जाणार आहेत. याबाबतचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकान्वये घेतला आहे. ही नवीन प्रणाली नागरिकांसाठी https://www.cvc.barti.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून याद्वारे नागरिकांना घरबसल्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. या बदलामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार असून प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता देखील वाढण्यास मदत होणार आहे.

ऑनलाइन प्रणालीची वैशिष्ट्ये आणि सुविधा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने ही नवीन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेणे शक्य होणार आहे. तसेच, अर्जावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याची सोय देखील यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अर्जदारांना डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणपत्र थेट ई-मेल व व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध होणार असून कोणत्याही शंकांचे निरसन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (AI) चॅटबॉटची सुविधा देखील देण्यात आली आहे. नागरिकांनी ऑनलाइन अपलोड केलेली कागदपत्रे समितीच्या कार्यालयात पुन्हा प्रत्यक्ष जमा करण्याची कोणतीही आवश्यकता राहणार नाही.

पडताळणी आणि शुल्क रचना

नव्या नियमांनुसार अर्ज आणि सादर केलेल्या पुराव्यांची ऑनलाइन पडताळणी करून शक्यतो ६० दिवसांच्या आत निर्णय घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार अर्जदाराला अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची मुभा असेल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची संधी देखील दिली जाईल. अर्जाच्या निर्णयाची माहिती अर्जदाराला एसएमएस, व्हॉट्सॲप किंवा ई-मेलद्वारे दिली जाईल. या प्रक्रियेसाठी शैक्षणिक प्रयोजनासाठी १०० रुपये, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ५०० रुपये, तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी, सेवाविषयक प्रयोजनासाठी आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी एक हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts