मुंबई | शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी राखीव प्रवर्गातून प्रवेश मिळालेल्या आणि जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र पडताळणीतील त्रुटी तातडीने पूर्ण कराव्यात. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हे आवाहन करण्यात आले आहे. कोणताही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्राअभावी व्यावसायिक शिक्षणाच्या संधीपासून वंचित राहू नये, हा यामागील मुख्य उद्देश आहे. उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, कृषी शिक्षण, वैद्यकीय व आयुष शिक्षण तसेच कला शिक्षण विभागांतर्गत ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे.
प्रवेश प्रक्रिया आणि त्रुटींची पूर्तता
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत राखीव प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या आणि जात वैधता प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून एसएमएस, ई-मेल व पत्राद्वारे सूचित केले गेले आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी अजूनही समित्यांशी संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अर्जदार लॉगीनद्वारे ऑनलाइन पद्धतीने प्रलंबित त्रुटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. त्रुटी दूर करण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांवरच आहे. प्रवेशाची संधी कायम ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी विनाकारण विलंब न करता ही कार्यवाही गांभीर्याने पूर्ण करावी.
विद्यार्थ्यांसाठी हेल्पडेस्क आणि मार्गदर्शक सुविधा
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व तांत्रिक सहाय्य मिळवून देण्यासाठी बार्टीने एक स्वतंत्र हेल्पडेस्क सुरू केला आहे. विद्यार्थ्यांनी यासाठी https://www.cvc.barti.in/ या नवीन पोर्टलचा वापर करावा. तसेच कोणत्याही शंकांच्या निरसनासाठी बार्टीच्या दूरध्वनी क्रमांकावर ०२०-२६३३३३३९, व्हॉट्सॲप क्रमांक ९४०४९९९४५२ (केवळ संदेशासाठी) आणि helpdesk@barti.in या ई-मेलवर संपर्क साधता येईल. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि बार्टीच्या महासंचालक तथा मुख्य समन्वयक दीपा मुधोळ-मुंडे यांनी या नव्या पोर्टल व हेल्पडेस्कचा लाभ घेऊन जात वैधता प्रमाणपत्राचे कामकाज लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
Source: Cosmo News Desk








