नाशिक | बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक पर्वाला अधिकृत सुरुवात झाली आहे. पवित्र कुशावर्त तीर्थावर शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
शंकराचार्य आणि संत-महंतांची उपस्थिती
कुशावर्त तीर्थावर पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्याला शृंगेरी पीठाचे उत्तराधिकारी शंकराचार्य स्वामी विधुशेखर भारती यांची विशेष उपस्थितੀ होती. तसेच या कार्यक्रमात दहा संन्यासी आखाड्यांचे श्रीमहंत, विविध प्रमुख पदाधिकारी आणि देशभरातून आलेले संत-महंत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मान्यवरांची उपस्थिती आणि पुढील कार्यक्रम
या सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिकमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासह राज्याचे अनेक मंत्री दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे शुक्रवारी रात्रीच नाशिकमध्ये पोहोचले होते. राष्ट्रपतींच्या हस्ते रामकुंडावर धर्मध्वजारोहण झाल्यानंतर, त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी हा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू त्र्यंबकेश्वरकडे प्रयाण करून कुशावर्त येथे पूजा करणार आहेत. पूजेनंतर त्या नाशिकमधील पोलिस अकादमीत विश्रांती घेऊन संध्याकाळी गोदाआरतीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे महंत नरसिंह कृपादास यांनी सिंहस्थ कुंभमेळा आणि गोदावरी सेवक समितीच्या कार्याची माहिती दिली, तसेच देशाच्या प्रगतीसोबत नागरिकांनी स्वधर्म पाळत देशाला उन्नत करावे, असे मत मांडले.
Source: Cosmo News Desk










