नाशिक | आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्रामच्या जागेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पंचवटीतील तपोवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांनी प्रशासनाला यासंदर्भात महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. कुंभमेळ्यासाठी साधुग्रामची जागा आधीच निश्चित करण्यात आली असून, या जागेला कोणताही पर्याय असू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दर बारा वर्षांनी निर्माण होणाऱ्या या समस्येवर प्रशासनाने आता कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.
साधुग्रामची जागा आणि वृक्षतोडीबाबत भूमिका
कुंभमेळ्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व अत्यंत मोठे असून साधू-महंतांसाठी हीच जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, असे नरेंद्राचार्य महाराजांनी सांगितले. तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यावर भर दिला. झाडे वाचली पाहिजेत आणि विकासाच्या नावाखाली सरसकट वृक्षतोड न करता केवळ गरज असेल तेवढीच झाडे काढावीत, असा सल्ला त्यांनी प्रशासनाला दिला. याशिवाय, दुष्काळाची स्थिती पाहता साधू-संत पाण्याच्या बाबतीत कोणताही अट्टाहास धरत नाहीत. उपलब्ध पाण्याचा वापर करून धार्मिक विधी पार पाडले जाऊ शकतात, त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावर अनावश्यक चिंता करण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
गोदावरी प्रदूषण आणि हिंदू संस्कृतीचे प्रदर्शन
गोदावरी नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर आणि ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला न मिळणे ही प्रशासकीय चूक असून शेतकऱ्यांनी न्यायालयात जाणे योग्यच आहे, असे ते म्हणाले. गरज पडल्यास शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संत-महंत मध्यस्थी करण्यास तयार आहेत. कुंभमेळ्याचे इव्हेंट होत असल्याच्या चर्चेवर बोलताना त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदू संस्कृती, परंपरा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश जगभर पोहोचवता येत असल्याचे सांगत कुंभमेळ्याच्या व्यापक प्रसिद्धीत काहीही गैर नाही, असे मत मांडले. या पत्रकार परिषदेस ज्ञानदास महाराज, संजयदास महाराज, महंत मुरलीदास महाराज, महंत सत्यदेवदास महाराज, महंत नंदरामदास महाराज, महंत डॉ. महेशदास महाराज, महंत राजेशदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज आणि महंत हेमंतदास महाराज उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk








