Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकच्या तरुणाचा अंतराळात डेटा सेंटर उभारण्याच्या दिशेने पराक्रम
Nashik

नाशिकच्या तरुणाचा अंतराळात डेटा सेंटर उभारण्याच्या दिशेने पराक्रम

नाशिक | डोक्यावर ‘अर्णब’ चक्रीवादळ, हवेचा नगण्य दाब आणि हाडे गोठवणारे उणे ५५ अंश सेल्सिअस तापमान अशा अत्यंत आव्हानात्मक वातावरणात पृथ्वीपासून २५.७ किलोमीटर उंचीवर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कार्यरत ठेवण्याचा पराक्रम भारतीय तरुणांनी करून दाखवला आहे. ‘बाँस्कॉन स्पेस’ या संशोधन पथकाने ‘हाय-अल्टिट्यूड बलून’च्या साहाय्याने ही मोहीम पूर्ण केली. या महत्त्वाच्या मोहिमेचे नेतृत्व नाशिकचा सुपुत्र श्लोक खैरार याने पुण्यातील सहकाऱ्यांसह केले आहे. या पथकात आदित्य शिदे व पार्थ कैरामकोंडा यांचा समावेश होता.

प्रतिकूल वातावरणात हाय-अल्टिट्यूड बलूनचे प्रक्षेपण

सोलापूरजवळून या विशेष हाय-अल्टिट्यूड बलूनचे प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी पूर्वेकडून पश्चिम घाटाच्या दिशेने सरकत असलेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाचा प्रभाव या पट्ट्यात होता. प्रतिकूल हवामानाचे आव्हान असतानाही पथकाने मोहीम चालू ठेवली. बलून वर गेल्यानंतर त्यावरील अत्याधुनिक कॅमेऱ्यांनी शेकडो किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेल्या चक्रीवादळाची आणि ढगांची दृष्ये टिपली. भविष्यकाळात अवकाशात सौर ऊर्जेवर चालणारी महाकाय डेटा सेंटर्स उभारणे आणि पृथ्वीवरून त्यांचा वापर सुलभ करणे, हे ‘बाँस्कॉन स्पेस’चे दीर्घकालीन ध्येय आहे.

उणे ५५ अंश तापमानात संगणक अविरत सुरू

बलून समताप मंडळात पोहोचल्यानंतर बाहेरील तापमान उणे ५५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. अशा गोठवणाऱ्या तापमानात आणि अंतराळातील रेडिएशनमध्ये सामान्यतः इलेक्ट्रॉनिक उपकरणे व संगणकीय चिप्स निष्प्रभ ठरतात. मात्र, पथकाने तयार केलेली यंत्रणा या थंडीतही पूर्ण कार्यक्षमतेने सुरू राहिली. या मोहिमेदरम्यान अवकाशात कार्यरत असलेल्या या एआय मॉडेलने तब्बल ४११ प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर पेलोड पॅराशूटच्या साहाय्याने प्रक्षेपणस्थळापासून ईशान्य दिशेला सुमारे ६२.७ किलोमीटर अंतरावर सुरक्षितपणे जमिनीवर उतरवण्यात आला.

Source: Cosmo News Desk

Related Posts