Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिक जिल्ह्यात औद्योगिक सुरक्षेचा बोजवारा, २० महिन्यांत १६ कामगारांचा मृत्यू
Nashik

नाशिक जिल्ह्यात औद्योगिक सुरक्षेचा बोजवारा, २० महिन्यांत १६ कामगारांचा मृत्यू

नाशिक | जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका बाजूला उद्योगांची भरभराट, उत्पादनवाढ आणि रोजगारनिर्मितीचे दावे केले जात असले, तरी कारखान्यांत राबणाऱ्या कामगारांच्या जिवाला काहीच हमी नाही, अशी विदारक स्थिती समोर आली आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या उपसंचालक कार्यालयाकडून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, मागील २० महिन्यांत जिल्ह्यात ३६ अपघात झाले असून यात तब्बल १६ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर २८ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. अंबड, सातपूर, सिन्नर, मालेगाव, दिंडोरी आणि इगतपुरीसह विविध भागांत हे अपघात घडले आहेत. विशेष म्हणजे, मृत्युमुखी पडलेले सर्वच कामगार हे कंत्राटी स्वरूपाचे होते.

दोन महिन्यांत आठ बळी आणि सुरक्षेचा अभाव

गेल्या दोन महिन्यांत दिंडोरी, ओझर, सिन्नर आणि सातपूर येथील औद्योगिक वसाहतीत झालेल्या अपघातांमध्ये तब्बल आठ कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. ४ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबरदरम्यान या दुर्घटना घडल्या आहेत. दुर्घटना आणि स्फोटासारख्या गंभीर घटनांची नोंद झाल्यानंतर २ नोव्हेंबर रोजी औद्योगिक सुरक्षा विभाग Nणे औद्योगिक सुरक्षा दिन साजरा करत सुरक्षेचे सल्ले दिले. मात्र सुरक्षेचा मूळ प्रश्न अद्यापही अधांतरीच आहे. कारखान्यांत कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणावर कार्यरत असतात आणि त्यांच्याकडून जोखमीची कामे, यंत्रसामग्री हाताळणे, तसेच देखभाल व तांत्रिक कामे करून घेतली जातात. मात्र, या कामगारांना पुरेसे प्रशिक्षण दिले जाते का, त्यांना आवश्यक सुरक्षा साधने दिली जातात का आणि नियमांची नियमित तपासणी होते का, असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रशासन आणि कामगार संघटनांची भूमिका

या संपूर्ण प्रकरणावर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या सहसंचालक अंजली आडे यांनी स्पष्ट केले आहे की, औद्योगिक क्षेत्रात कामगारांची सुरक्षा ही विभागाची सर्वोच्च प्राथमिकता असून ‘अपघातमुक्त उद्योग’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियमांच्या अंमलबजावणीवर भर दिला जात आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र दुर्घटनाग्रस्त कामगार संघटनेचे अध्यक्ष कैलास मोरे यांनी सांगितले की, कंत्राटी कामगार कायद्याचा गैरवापर करून अकुशल कामगारांना तांत्रिक कामांना जुंपले जाते. अपघातात मृत्यू झाल्यास कोणीही जबाबदारी घेत नाही आणि प्रकरण दडपण्याचे प्रयत्न केले जातात. या सर्व प्रकारामुळे औद्योगिक सुरक्षा विभागाची भूमिका संशयास्पद वाटत असून, अजून किती कामगारांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts