नाशिक | देवळाली कॅम्प परिसरातील लोहशिंगवे येथील लहवित रेल्वेस्थानक परिसराजवळ प्रस्तावित असलेल्या पादचारी भुयारी मार्गाच्या विस्तारीकरणाला रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यापूर्वी प्रस्तावित असलेला २.६५ मीटर गुणिले २.५० मीटर आकाराचा भुयारी मार्ग आता ३.५० मीटर गुणिले ३.५० मीटर आकाराचा बांधणे तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
खासदारांचा पत्रव्यवहार आणि स्थळपाहणी
स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार खासदार राजाभाऊ वाजे यांनी १२ आणि १८ सप्टेंबर रोजी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत या भुयारी मार्गाच्या आकाराबाबत विचारणा केली होती. या पत्रव्यवहाराची दखल घेत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने स्थानिक नागरिक व ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत संयुक्त स्थळपाहणी केली. या पाहणीदरम्यान प्रस्तावित भुयारी मार्गाच्या विस्तारित आकाराची तांत्रिक व्यवहार्यता तपासण्यात आली.
मध्य रेल्वेचे अपर मंडल रेल्वे व्यवस्थापक प्रशासन प्रवीण कुमार पाठक यांनी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी खासदारांना पाठविलेल्या पत्रात ३.५० मीटर गुणिले ३.५० मीटर आकाराचा पादचारी भुयारी मार्ग बांधणे तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या विस्तारित भुयारी मार्गाच्या उभारणीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे.
रस्ते जोडणी आणि जलनिस्सारण व्यवस्था
भुयारी मार्गाच्या यशस्वी उभारणीसाठी रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना पोहोच मार्ग तयार करून ते विद्यमान रस्त्यांच्या जाळ्याशी जोडणे आवश्यक असणार आहे. या कामासाठी संबंधित स्थानिक प्राधिकरणे आणि इतर भागधारकांशी समन्वय साधण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय, भुयारी मार्गाच्या परिसरात पावसाचे पाणी तसेच साचणाऱ्या इतर पाण्याचा योग्य निचरा व्हावा, यासाठी प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधित खासगी जमीनमालकांशी समन्वय साधून उंचावरील भागाकडून जलनिस्सारणाची पाइपलाइन टाकण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या विस्तारित भुयारी मार्गाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि रेल्वे प्रवाशांना सुरक्षित व सोयीस्कर ये-जा करणे शक्य होणार आहे.
Source: Cosmo News Desk





