नाशिक | मालेगाव तालुक्यातील टेहरे येथील सर्वांगीण विकास मंडळ संचालित समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बँक खात्यांतून ७० लाख ८२ हजार ६१६ रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपप्रकरणी मुख्य संशयित माजी मुख्याध्यापक ज्ञानदेव दामू पाटील, त्यांची पत्नी कमल ज्ञानदेव पाटील आणि सून प्रियंका चिंतामण गांगुर्डे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती माधव जामदार यांनी हा निर्णय दिला असून, शैक्षणिक संस्था आणि शासकीय अनुदानाचा निधी अपहार हा गंभीर गुन्हा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.
अपहार आणि बनावट कागदपत्रांचा आरोप
टेहरे येथील सर्वांगीण विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जिभाऊ नारायण शेवाळे यांनी मालेगाव छावणी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. ज्ञानदेव पाटील हे संस्थेचे सचिव होते आणि २००८ पर्यंत त्यांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सांभाळली होती. सेवानिवृत्तीनंतर कोणताही कायदेशीर अधिकार नसतानाही त्यांनी पंजाब नॅशनल बँकेतील वेतनेतर अनुदान खाते, कनिष्ठ महाविद्यालयाचे खाते आणि शालेय पोषण आहार खात्यातून रक्कम काढल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. ही रक्कम स्वतःच्या, पत्नीच्या आणि सुनेच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आली तसेच काही रक्कम रोख स्वरूपात काढण्यात आली. यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.
न्यायालयाचा निर्णय आणि अटकेची शक्यता
सन २०१७ पासून संस्थेच्या बँक खात्यांचे लेखापरीक्षण केले असता, एकूण ७० लाख ८२ हजार ६१६ रुपयांचा गैरव्यवहार उघड झाला. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आरोपांचे गांभीर्य आणि शासकीय अनुदानाच्या निधीशी संबंधित गैरव्यवहाराचे स्वरूप लक्षात घेता न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच, अंतरिम दिलासा १५ दिवसांनी वाढवून देण्याची आरोपींची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली असून, यामुळे या तिन्ही संशयितांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे.
Source: Cosmo News Desk





