नाशिक | राज्यात औद्योगिकीकरणाचा वेग वाढत असला तरी कारखान्यांमधील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. उत्पादनवाढ आणि उद्योगविस्ताराच्या चर्चेदरम्यान कारखान्यांमधील अपघातांमध्ये कामगारांचे प्राण जात आहेत. केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, २०२० ते २०२५ या कालावधीत महाराष्ट्रातील नोंदणीकृत कारखान्यांमध्ये तब्बल १ हजार ३१ कामगारांचा मृत्यू झाला असून ४ हजार ८९३ कामगार जखमी झाले आहेत. ही आकडेवारी औद्योगिक सुरक्षा उपायांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मोठे प्रश्न उपस्थित करणारी आहे. वर्षनिहाय आकडेवारी पाहता, २०२० मध्ये १५४ कामगारांचा मृत्यू आणि ७७८ जखमी, २०२१ मध्ये १८० मृत्यू आणि ७९३ जखमी, तर २०२२ मध्ये १७८ कामगारांचा मृत्यू आणि ८१९ जण जखमी झाले. २०२३ मध्ये मृत्यूचा आकडा १९० वर पोहोचला आणि ८१८ कामगार जखमी झाले. २०२४ मध्ये १७५ कामगारांचा मृत्यू झाला व ८८१ जण जखमी झाले. उपलब्ध माहितीनुसार, २०२५ मध्ये १७२ कामगारांनी आपला जीव गमावला असून ८०४ जण जखमी झाले आहेत.
अपघातांची कारणे आणि कायमचे जायबंदी कामगार
कारखान्यांमध्ये यंत्रसामग्री हाताळताना होणारे अपघात, उंचावरून पडणे, विद्युत धक्के, रासायनिक पदार्थांची गळती तसेच आग आणि स्फोटांमुळे हे अपघात घडतात. अनेक ठिकाणी अकुशल कामगारांना मशिन हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. गेल्या सहा वर्षांत जखमी झालेल्या ४ हजार ८९३ कामगारांपैकी जवळपास सर्वच कामगार कायमचे जायबंदी झाले आहेत. कुणाचा हात, कुणाचा पाय तर कुणाला गंभीर दुखापत झाली आहे. हे कामगार कोणतेही काम करू शकत नसल्याने त्यांच्यासह कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाला आहे. यातील अनेक कामगार कंपनी व्यवस्थापनाशी न्यायालयीन लढा देत आहेत. गेल्या आठ दिवसांत केवळ नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रात ४ कामगारांचा बळी गेला आहे. मात्र, यातून कारखानदारांनी कोणतीही सुधारणा केल्याचे दिसत नाही. औद्योगिक सुरक्षा विभाग केवळ नावापुरता राहिला असून चौकशा पैशांच्या जोरावर दाबल्या जातात, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र दुर्घटनाग्रस्त कामगार संघटनेचे अध्यक्ष कैलास मोरे यांनी दिली आहे.
कागदोपत्री ऑडिट आणि सुरक्षेचे उल्लंघन
अनेक कारखान्यांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना केवळ कागदावरच सीमित असतात. कंत्राटी कामगारांना पुरेसे प्रशिक्षण दिले जाते का, धोकादायक यंत्रांवर काम करताना संरक्षक साधने दिली जातात का, सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती नियमांनुसार आहे का, याची तपासणी होत नाही. अपघात घडल्यानंतर चौकशी आणि नुकसानभरपाईपुरती यंत्रणा मर्यादित न राहता प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे.
Source: Cosmo News Desk





