नाशिक | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ‘एकवेळ समझोता’ (ओटीएस) गटात पात्र ठरलेल्या राज्यातील १ लाख ६९ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती आणि शेतीमालाला मिळणाऱ्या कमी दरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती जाहीर केली होती. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ मिळाल्यानंतर, २ लाख रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी आता ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नाशिक विभागातील लाभार्थी
या योजनेमध्ये नाशिक विभागातील तब्बल ४८ हजार ३७९ शेतकऱ्यांचा समावेश असून, एकट्या नाशिक जिल्ह्यातील ९ हजार ९६६ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ही पात्रता यादी संबंधित बँक शाखांसह गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, गाव, विशिष्ट ओळख क्रमांक, बँक कर्जाचा तपशील, एकूण थकबाकी, एकवेळ समझोत्यानुसार भरावाचा स्वहिस्सा आणि शासनाकडून मिळणाऱ्या लाभाच्या रकमेचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. जाहीर झालेल्या या पहिल्या यादीत राज्यातील १० जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या ६९ हजार ६३५, तर २१ व्यापारी बँकांच्या १ लाख १८५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
अटी आणि प्रमाणीकरण प्रक्रिया
प्रत्यक्ष कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२७ पूर्वी आपल्या हिस्स्याची रक्कम संबंधित बँकेत जमा करणे बंधनकारक असणार आहे. शेतकऱ्याने ही रक्कम भरल्यानंतर शासनाकडून २ लाख रुपयांची लाभाची रक्कम संबंधित बँक खात्यात वर्ग केली जाईल आणि त्यानंतरच शेतकरी अधिकृतपणे ‘कर्जमुक्त’ होईल असे सहकार आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्याने बँकेत स्वहिस्सा भरल्यानंतर दर शुक्रवारी संबंधित बँक ही माहिती शासकीय पोर्टलवर अद्ययावत करेल. ‘महाआयटी’कडून पडताळणी पूर्ण झाल्यावर आधार प्रमाणीकरणाची सुविधा खुली होईल आणि या प्रक्रियेसाठी शेतकऱ्याकडे ॲग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे.
Source: Cosmo News Desk






