नवी दिल्ली | नवी दिल्लीतील भारत मंडपम येथील खुल्या रंगमंचावर ४५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याच्या निमित्ताने ‘द फोक आख्यान’ हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा परिचय राजधानी दिल्लीतील रसिकांना करून देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशाली दिघावकर आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.
‘थाट ह्यो जुना, खेळ हा नवा’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात गण, गवळण, भारूड, अभंग, पोवाडा, लावणी, ओवी आणि गोंधळ यांसारख्या विविध लोककलांचे आधुनिक सादरीकरण करण्यात आले. संतपरंपरा, पंढरपूरची वारी, विठ्ठलभक्ती, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम तसेच महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा या सादरीकरणातून मांडण्यात आला. ढोलकी, पखवाज, संबळ, हलगी, खंजिरी, डिमडी, धनगरी ढोल, तारपा आणि पावरी या पारंपरिक वाद्यांच्या तालांवर कलाकारांनी ऊर्जावान सादर केले. या कार्यक्रमाची संकल्पना आणि संगीत संयोजन हर्ष राऊत व विजय कापसे यांचे असून गीतलेखन ईश्वर अंधारे यांनी केले आहे, तर निर्मिती रणजित गुगळे आणि भूषण मेहेरे यांनी सांभाळली आहे.
दिल्लीतील रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या या कार्यक्रमाने दिल्लीतील रसिकांना आपल्या सादरीकरणाने आकर्षित केले. या सोहळ्यात केवळ मराठी बांधवच नव्हे, तर इतर नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोककलेला भाषेच्या सीमा नसतात, याचा अनुभव या कार्यक्रमातून आला. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील ऊर्जा, परंपरा आणि कलात्मकतेची ओळख यामुळे उपस्थितांना झाली.
महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांना समकालीन सादरीकरणाची जोड देऊन त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाच्या संगीता वराडे, महाराष्ट्र सदनचे सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे यांच्यासह अनेक नागरिक या सांस्कृतिक सोहळ्याला उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk











