मुंबई | महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ (सीपीए) महाराष्ट्र शाखेचे पदसिद्ध सह-अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी मिळाली आहे. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी समितीवर भारत सी.पी.ए. विभागाचे प्रतिनिधी म्हणून त्यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधिमंडळ आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची व अभिमानास्पद घडामोडी मानली जात आहे.
नियुक्तीबद्दल अभिनंदन आणि लंडन मुख्यालयाचे पत्र
या महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचे पदसिद्ध सह-अध्यक्ष प्रा. राम शिंदे, उप सभापती सचिन अहिर तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या लंडन येथील हाऊसेस ऑफ पार्लमेंट मुख्यालयाचे उपमहासचिव जार्विस मातिया यांनी २० ऑक्टोबर २०२६ रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे ॲड. राहुल नार्वेकर यांच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी समितीवरील सदस्यपदाच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन व स्वागत केले आहे. केपटाऊन येथे गेल्याच महिन्यात संपन्न झालेल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळ आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी त्यांच्या या निवडीवर शिक्कामोर्तब झाले होते.
आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि आगामी ५ नोव्हेंबरची बैठक
राष्ट्रकुल देशांमधील संसद व विधिमंडळांमध्ये सहकार्य वाढवणे, लोकशाही मूल्यांचे संवर्धन करणे, संसदीय कार्यपद्धतींची देवाणघेवाण करणे आणि सुशासन प्रोत्साहन देणे हे लंडन मुख्यालया असलेल्या या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखा ही देशातील सर्वप्रथम स्थापित संस्था आहे. या नियुक्तीमुळे महाराष्ट्र विधिमंडळाला राष्ट्रकुलातील विविध देशांच्या प्रतिनिधीगृहांशी संवाद साधण्याची, उत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्याची आणि लोकशाही संस्था बळकट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदान देण्याची संधी मिळणार आहे. यादरम्यान, राष्ट्रकुल संसदीय मंडळ कार्यकारी समितीतील विभागीय प्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांसाठी आगामी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता (जीएमटी) एक विशेष परिचयात्मक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सदस्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि प्रशासकीय कार्यचौकटीविषयी मार्गदर्शन केले जाणार असून, आगामी २०२७ च्या मध्य-वर्षीय बैठकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे.
Source: Cosmo News Desk





