कोल्हापूर | सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ‘महापल्स’ या अद्ययावत प्रकल्पाची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून प्रायोगिक तत्त्वावर (पायलट प्रोजेक्ट) करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ झाला. उत्तर प्रदेश सरकारच्या ‘HOPE’ मॉडेलपासून प्रेरणा घेऊन हा प्रकल्प राबवला जात असून, आयआयटी मंडीचे अधिष्ठाता प्रा. सत्वशील पवार आणि हर्षवर्धन काळोखे यांच्या सहकार्याने यात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हा प्रकल्प उत्तर प्रदेशपेक्षाही अधिक प्रगत असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आणि एआय प्रणाली
कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील एकूण १०४ शासकीय आरोग्य संस्था या डिजिटल यंत्रणेशी जोडल्या जाणार आहेत. यामध्ये १ सामान्य रुग्णालय, ५ उपजिल्हा रुग्णालये, १५ ग्रामीण रुग्णालये आणि ८३ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश असून, या सर्व संस्था एका जिल्हा कमांड सेंटरशी जोडल्या गेल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आरोग्य संस्थांवर रिअल-टाइम नजर ठेवण्यात येत आहे. यासाठी नवीन सीसीटीव्ही बसविण्याची गरज भासली नसून, आधीपासून उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचा वापर करून एआय आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाद्वारे फुटेजचे विश्लेषण केले जात आहे. या प्रणालीद्वारे रुग्णालयांमधील डॉक्टरांची उपस्थिती, रुग्णांची संख्या, औषधांचा साठा, स्वच्छता, राऊसकीपिंग तसेच आपत्कालीन घटनांवर लक्ष ठेवले जाते. एखादा रुग्ण अचानक कोसळणे किंवा आग लागण्यासारख्या घटनांची प्रणाली तात्काळ ओळख करून संबंधित अधिकाऱ्यांना थेट अलर्ट पाठवते.
कर्मचाऱ्यांचे उत्तरदायित्व आणि भविष्यातील अंमलबजावणी
या प्रणालीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांच्या कामकाजावर थेट लक्ष ठेवता येणार असून बायोमेट्रिक किंवा फेस रीडिंगची गरज उरलेली नाही. त्रुटी आढळल्यास तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना थेट अलर्ट मिळतो. यामुळे कामावर दांडी मारणे किंवा चुकीची माहिती देण्यासारख्या प्रकारांना आळा बसणार असून कर्मचाऱ्यांचे उत्तरदायित्व वाढेल. कोल्हापुरातील या यशस्वी प्रयोगानंतर आगामी काळात हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये लागू केला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे कौतुक करून ‘एक्सलंट’ अशी प्रतिक्रिया दिली असल्याचे सांगत, सर्वसामान्य नागरिकही या प्रणालीला अशीच प्रतिक्रिया देईल असा विश्वास मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.
Source: Cosmo News Desk











