मुंबई | उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जोगेश्वरी येथील इस्माईल युसुफ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला भेट देऊन तेथील शैक्षणिक सुविधांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकासकामांच्या प्रस्तावांवर गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
विकासकामे आणि वसतिगृहाबाबत निर्देश
या पाहणी दौऱ्यावेळी महाविद्यालयातील विविध विकासकामे, पायाभूत सुविधांचा विस्तार, विद्यार्थिनींच्या वसतिगृहाचे बांधकाम तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरण, क्रीडा संकुलाची उभारणी, महाविद्यालय परिसरात १५० फूट उंचीचा भव्य राष्ट्रध्वज उभारणे तसेच विद्यार्थिनींसाठी नवीन वसतिगृह बांधण्यासंदर्भातील प्रस्तावांवर चर्चा झाली. विद्यार्थिनींच्या निवासाची वाढती गरज लक्षात घेता, ३२० विद्यार्थिनींची निवासक्षमता असलेल्या नवीन वसतिगृहासाठी सुधारित आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या. तसेच, महाविद्यालयातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
विद्यार्थ्यांशी संवाद आणि उपाहारगृहाची पाहणी
पाहणीदरम्यान मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविद्यालयाच्या उपाहारगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत नाश्ता करून त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना उपाहारगृहात दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि स्वच्छ नाश्ता उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. या दौऱ्यावेळी खासदार रवींद्र वायकर, आमदार अनंत (बाळा) नर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, सहसंचालक रुपेश राऊत यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk








