नाशिक | आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांच्या विकासकामांना गती देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. साधू-महंतांची नाराजी दूर करत शासनाने शैव आणि वैष्णव आखाड्यांच्या निधीत वाढ केली असून, आता प्रत्येक आखाड्याला तब्बल ७ कोटी रुपयांचा विकासनिधी मिळणार आहे. कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर आता प्रत्यक्ष पायाभूत सुविधांच्या उभारणीला वेग देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
आखाड्यांच्या निधीत वाढ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा
आखाड्यांच्या अंतर्गत कामांसाठी सुरवातीला प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी निश्चित केला होता. मात्र, विकासकामांचा वाढता विस्तार पाहता साधू-महंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला. त्यानंतर हा निधी ५ कोटींपर्यंत वाढवण्यात आला होता. तरीही कामांची व्याप्ती आणि साधू-महंतांमधील असंतोष लक्षात घेऊन शासनाने पुन्हा अतिरिक्त २ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता सर्व आखाड्यांना प्रत्येकी ७ कोटी रुपये उपलब्ध होणार असून, आखाडा परिषदेने या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.
पुढील ७ ते ८ महिन्याचा कालावधी विकासकामांच्या दृष्टीने अत्यंत कळीचा ठरणार आहे. त्र्यंबकेश्वरचे १० शैव आखाडे आणि नाशिकचे ३ वैष्णव आखाडे यांनी आपल्या परिसरातील कामांची सविस्तर यादी संबंधित नगरपालिका आणि प्रशासनाकडे सुपूर्द केली आहे. ही कामे कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून मंजूर केली जाणार आहेत.
अन्नछत्राची जबाबदारी आणि जुलै २०२७ पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य
नव्या घाटांची उभारणी, दर्शनपथ, अपूर्ण रस्त्यांचे डांबरीकरण, पाणीपुरवठा योजना आणि अतिक्रमण निर्मूलन यांसारखी महत्त्वाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावी लागणार आहेत. ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान अपूर्ण कामांमुळे निर्माण झालेल्या अडचणींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जुलै २०२७ पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. तसेच, १३ आखाड्यांतील अन्नछत्र शिवसेनेच्या वतीने चालवले जाणार आहे.
कुंभमेळा काळात भाविक आणि साधू-संतांच्या सेवेसाठी चालवले जाणारे अन्नछत्र हा आखाड्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व खर्चिक भाग असतो. नाशिकमधील ३ आणि त्र्यंबकेश्वरमधील १० अशा एकूण १३ आखाड्यांमध्ये चालणाऱ्या अन्नछत्राची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली आहे. हे अन्नछत्र शिवसेनेकडून चालवण्यात येणार असल्याने आखाड्यावरील भोजनाचा खर्चाचा मोठा ताण हलका होणार असल्याची माहिती अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत शंभरानंद सरस्वती यांनी दिली.
Source: Cosmo News Desk





