मुंबई | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सुविधा, सुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छतेच्या व्यवस्थांचे काटेकोर व समन्वित नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी हे नाव देण्यासंदर्भात विधानमंडळाच्या अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
चैत्यभूमी तयारीचा आढावा आणि बैठकीतील उपस्थिती
विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात आयोजित बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृह राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री संजय बनसोडे, समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, भाई गिरकर आणि विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, रेल्वे, मुंबई महापालिका व विविध बौद्ध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ७० वा महापरिनिर्वाण दिन असून ५ व ६ डिसेंबरला चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात भाविकांची संख्या सुमारे १५ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दादर स्थानकाचे नामकरण आणि इंदू मिल स्मारक निधी
दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्याच्या मागणीवर राज्य सरकारने यापूर्वीच तत्वतः मान्यता देऊन केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. केंद्राकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधानमंडळाच्या समितीशी संबंधित प्रक्रिया विधिमंडळ अधिवेशनात पूर्ण केली जाईल. इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही आणि मुख्य पुतळ्याचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच अनुयायांच्या सुरक्षेसाठी चैत्यभूमी परिसरात धरणे, निदर्शने, मोर्चे किंवा आंदोलनांना अधिकृतपणे बंदी जाहीर करण्याबाबत गृह विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.
Source: Cosmo News Desk











