पंढरपूर | आगामी कार्तिकी वारीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, यात्रा कालावधीमध्ये एकाही वारकऱ्याची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यावी. सर्वसामान्य वारकरी हाच आपला खरा व्हीआयपी असून त्याचे समाधान झाले पाहिजे आणि सर्व सुविधांसह वेळेत दर्शन मिळाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विविध विभागांचे अधिकारी, तसेच आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, उत्तम जानकर, नगराध्यक्ष प्रणिती भालके आणि मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांच्यासह इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशासन आणि आरोग्य सुविधांचे नियोजन
बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारी निर्मल व स्वच्छ राखण्यावर भर दिला. वारकरी हा व्हीआयपी असल्याने व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. यात्रा कालावधीत वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्याच्या उद्देशाने दहा लाख पाणी बॉटलचे मोफत वाटप सुरू करण्यात आले असून, गरज भासल्यास आणखी बॉटल उपलब्ध करून घ्याव्यात असे सुचवण्यात आले. वीज वितरण कंपनीने संपूर्ण यात्रा काळात सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ ठेवावे. तसेच, राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील धूळ थांबवण्यासाठी तात्पुरते डांबरीकरण करून कामे त्वरित पूर्ण करावीत. नगरविकास विभागाकडून भक्ती सागरसह इतर ठिकाणी सुविधांसाठी आणि पंढरपूर शहरात वारकऱ्यांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
स्वच्छता, आरोग्य आणि पोलीस बंदोबस्त
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी प्रशासनतर्फे करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. पंढरपूर शहरात स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे बाराशे कर्मचारी कार्यरत असून पंधराशे शौचालयांची सोय केली आहे. तसेच नगरपालिकेमार्फत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. जिल्हा परिषदेने पन्नास लाखांची औषधे खरेदी केली असून आरोग्य विभागाकडून आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. पंढरपूर नगरपरिषदेसाठी स्वीपर मशीन आणि जेटिंग मशीनही उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की, वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभाग पूर्णपणे सज्ज असून गर्दी नियंत्रणासाठी वाहतुकीचे चोख नियोजन करण्यात आले आहे आणि संपूर्ण यात्रा काळात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Source: Cosmo News Desk










