Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • महाराष्ट्र वेतन नियम २०२६ लागू, कामगारांच्या वेतनाला संरक्षण
Maharashtra

महाराष्ट्र वेतन नियम २०२६ लागू, कामगारांच्या वेतनाला संरक्षण

महाराष्ट्र शासनाचे कामगार मंत्रालय आणि सचिवालय इमारत

मुंबई | राज्य शासनाने ‘महाराष्ट्र वेतन नियम, २०२६’ अधिसूचित केले असून हे नियम ५ नोव्हेंबर २०२६ रोजी शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आले आहेत. या नियमांमुळे वेतन संहिता लागू असलेल्या आस्थापनांतील कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतनाची गणना, कामाचे तास, साप्ताहिक विश्रांती, अतिकालिक वेतन, वेतन कपात आणि वेतन नोंदी याबाबत एकסमान कार्यपद्धती लागू झाली आहे. या नव्या नियमांमुळे कामगारांच्या वेतन संरक्षणाला मोठे बळ मिळाले असल्याची माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली आहे. राज्य शासनाने या नियमांद्वारे महाराष्ट्र किमान वेतन नियम, १९६३ आणि महाराष्ट्र वेतन प्रदान नियम, १९६३ अधिक्रमित केले आहेत. वेतन संहिता, २०१९ अंतर्गत तयार केलेले हे नियम राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन निश्चित करण्यासाठी लागू असणार नाहीत.

वेतन गणना आणि कामाचे तास

वेतनाच्या प्रमाणित व्याख्येमध्ये मूळ वेतन, महागाई भत्ता आणि रिटेनिंग भत्त्याचा समावेश करण्यात आला आहे. वेतनातून वगळलेल्या भत्त्यांचे किंवा अन्य घटकांचे प्रमाण एकूण मोबदल्याच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास त्यापेक्षा जास्त रक्कम वेतनात समाविष्ट केली जाईल, ज्यामुळे ग्रॅच्युइटीसह अन्य वैधानिक लाभांच्या गणनेचा आधार अधिक स्पष्ट होईल. राज्य शासन किमान वेतनाचा दर दैनंदिन आधारावर निश्चित करेल. दैनंदिन वेतनास आठने भागून तासाचा दर, तर २६ ने गुणून मासिक दर निश्चित केला जाईल. कामाच्या स्वरूपावरून अतिकुशल, कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा व्यवसायांच्या श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत. कामगारांच्या परिवर्तनीय महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा सुधारणा केली जाईल, जी भारत सरकारच्या श्रम ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या औद्योगिक कामगारांच्या सरासरी ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे दरवर्षी १ एप्रिलपूर्वी आणि १ ऑक्टोबरपूर्वी गणली जाईल. दैनंदिन वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सामान्य कामकाजाचा दिवस आठ तासांचा असेल आणि अन्य वेतन कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांचे काम आठवड्याला ४८ तासांपेक्षा अधिक असणार नाही. प्रत्येक कर्मचाऱ्यास साप्ताहिक विश्रांती देणे बंधनकारक असून विश्रांतीच्या दिवशी काम घेतल्यास बदली विश्रांती द्यावी लागेल.

कपात, नोंदी आणि दावे

एका वेतन कालावधीत कर्मचाऱ्याच्या वेतनातून होणारी एकूण कपात ५० टक्क्यांपेक्षा अधिक करता येणार नाही आणि त्याहून अधिक रक्कम पुढील वेतन कालावधीत टप्प्याटप्प्याने वसूल करावी लागेल. दंड किंवा नुकसानभरपाईपोटी कपात करण्यापूर्वी नियोक्त्याने कर्मचाऱ्याला लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कारणे दाखवा सूचना देऊन स्पष्टीकरणाची संधी देणे बंधनकारक आहे. प्रत्येक नियोक्त्याला कर्मचारी नोंदवही, वेतन व अतिकालिक वेतन नोंदवही तसेच उपस्थिती नोंदवही इलेक्ट्रॉनिक किंवा भौतिक स्वरूपात ठेवावी लागेल आणि शेवटची नोंद केल्यापासून पाच वर्षे जतन करावी लागेल. वेतन देण्याच्या दिवशी किंवा त्यापूर्वी वेतन चिठ्ठी देणे बंधनकारक असून रक्कम मिळण्यासाठी नामनिर्देशन करता येईल. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर किंवा ठावठिकाणा नसlल्यास रक्कम तीन किंवा सहा महिन्यांत सहायक कामगार आयुक्तांकडे जमा करणे आवश्यक आहे. वेतन, साप्ताहिक विश्रांतीचे मानधन, अतिकालिक वेतन, बेकायदेशीर कपात, किमान बोनस किंवा वेतनातील लिंगभेदासंबंधी दावा असल्यास कर्मचारी, नोंदणीकृत कामगार संघटना किंवा निरीक्षक- तथा- सुविधाकार विहित नमुन्यात प्रत्यक्ष अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अधिसूचित प्राधिकाऱ्याकडे एकत्रित अर्ज दाखल करू शकतात, असे कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी स्पष्ट केले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts