गडचिरोली | खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास करून भविष्यात एक महान गडचिरोली बनवून दाखवली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. लॉईडस अँड मेटल एनर्जी लिमिटेडच्या वतीने बोदली येथे उभारण्यात आलेल्या लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेनरशिप केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुअल ओराम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कौशल्याचा विकास आणि रोजगार निर्मिती
लॉयड्सच्या माध्यमातून गडचिरोली परिसरात झालेला विकास हा नफा केंद्रित नसून माणूस केंद्रित असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. एकेकाळी नक्षलवादी असलेले तरुण आता प्रशिक्षण घेऊन कर्मचारी म्हणून काम करत आहेत. पाच वर्षांपूर्वी या भागात येण्यासाठी भीती वाटायची, पण आता इथल्या तरुणी विदेशात जाऊन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत, असा मोठा बदल घडला आहे. या केंद्राच्या माध्यमातून स्थानिक तरुण आणि महिलांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम व स्वावलंबी बनवले जात आहे.
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अडीच हजार नियुक्ती पत्रांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. तसेच ॲडव्हान्स मिनरल प्रोसेसिंग वर्कशॉप, लॉयडस सेंट्रल किचन आणि ग्रीवन्स रिड्रेसल पोर्टल या उपक्रमांचे उद्घाटनही यावेळी झाले. या केंद्रात तांत्रिक आणि अभियांत्रिकी कौशल्ये, बांधकाम आणि सुरक्षा, लॉजिस्टिक्स आणि ड्रायव्हिंग, हॉस्पिटॅलिटी आणि डिजिटल कौशल्ये तसेच उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पर्यावरण संरक्षण आणि हरित गडचिरोली
उद्योगांमुळे काही झाडे कापावी लागली तरी वनांचे रक्षण झालेच पाहिजे, यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला. हरित गडचिरोली अधिक हरित करण्यासाठी जिल्ह्यात ५ कोटी झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला असून त्यापैकी आतापर्यंत १ कोटी झाडे लावण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात लॉयड्सचे प्रबंध संचालक बी. प्रभाकरन यांनी प्रास्ताविक केले. या सोहळ्याला खासदार नामदेव किरपान, आमदार धर्मराव बाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk











