नाशिक | युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालेल्या महाराष्ट्रातील प्रतापगड, राजगड, साल्हेर आणि खांदेरी या चार ऐतिहासिक किल्ल्यांवर आता ८० सुरक्षारक्षकांचा पहारा असणार आहे. यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने २ कोटी ९३ लाख ८६ हजार ७२० रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. किल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव जतन करणे आणि पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे हा यामागचा उद्देश आहे.
किल्ल्यांवर कंत्राटी पथक तैनात
भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश संकल्पनेअंतर्गत महाराष्ट्रातील या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करण्यासाठी, अनधिकृत हालचाली रोखण्यासाठी आणि अनुचित घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने सुरक्षा यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतापगड, राजगड, साल्हेर आणि खांदेरी या प्रत्येक किल्ल्यावर १९ सुरक्षारक्षक आणि एक सुरक्षा पर्यवेक्षक नेमण्यात येणार आहे. चारही किल्ल्यांवर मिळून ७६ सुरक्षारक्षक आणि चार पर्यवेक्षक असे एकूण ८० जणांचे पथक महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळामार्फत ११ महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर काम करेल.
पोर्टेबल कॅबिनेट आणि कायमस्वरूपी सुरक्षा
सुरक्षा रक्षकांच्या सोयीसाठी किल्ल्यांच्या परिसरात पोर्टेबल कॅबिनेटची व्यवस्था केली जाणार आहे. ही सुविधा उभारताना पुरातत्त्वीय निकष आणि ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व लक्षात घेऊन काळजी घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच भविष्यात कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारण्यासाठी पुरातत्त्व संचालनालयाला निर्देश देण्यात आले असून, त्यांना सहा महिन्यांच्या आत सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे.
Source: Cosmo News Desk





