धुळे | दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी हिरवा चारा सहज उपलब्ध व्हावा यासाठी वैरण विकास योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर चारा निर्मितीला चालना देऊन पशुपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा उद्देश आहे. पशुपलाकांनी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन साधत वैरण पिकांची लागवड करावी आणि दुग्ध व्यवसायामधून आपले आर्थिक उत्पन्न अधिक वाढवावे, असे आवाहन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
बियाणे वाटप आणि पशुपालकांसाठी मार्गदर्शन
विखरण येथील कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थित पशुपालकांना मका आणि ज्वारीच्या वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात आले. शेतीची जोड म्हणून पशुपालन हा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे, मात्र दुष्काळाच्या काळात चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाल्यामुळे पशुपालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्येवर मात करण्यासाठी जनावरांच्या चाऱ्याचे योग्य नियोजन करणे काळाची गरज आहे. मका तसेच ज्वारीसारख्या पौष्टिक वैरण पिकांची लागवड केल्यास जनावरांना पुरेशा प्रमाणात हिरवा चारा मिळू शकतो. या पौष्टिक चाऱ्यामुळे जनावरांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते आणि त्यांचे दूध उत्पादनही टिकून राहते, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुग्ध व्यवसायातून आर्थिक प्रगती साधण्याचे आवाहन
शेतकरी कुटुंबांसाठी दुग्ध व्यवसाय हा नियमित उत्पन्नाचा एक भरवशाचा स्रोत असल्याचे सांगत, सुधारित पशुपालन पद्धती, चाऱ्याचे अचूक व्यवस्थापन आणि उपलब्ध साधनसामग्रीचा कार्यक्षम वापर यावर भर दिल्यास हा व्यवसाय अधिक फायदेशीर ठरू शकतो, असे मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले. पारंपरिक शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देऊन शेतकऱ्यांनी आपली आर्थिक प्रगती साधावी आणि वैरण विकास योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, भाजपचे जिल्हा डी. एस. गिरासे, विखरणचे सरपंच महेंद्र पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे डॉ. गिरीश पाटील, गटविकास अधिकारी रमेश नेतनराव, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. भूषण वाकडे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Source: Cosmo News Desk











