धुळे | देशाच्या रक्षणासाठी पतीचे बलिदान देणाऱ्या तीन वीरपत्नींच्या शेतजमिनीचा प्रश्न मार्गी लागला आहे. पालकमंत्री आणि राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या निर्देशानंतर जिल्हा प्रशासनाने ही कार्यवाही केली आहे. या निर्णयामुळे धुळे जिल्ह्यातील तीन वीरपत्नींना धुळे तालुक्यातील नवलाणे येथे प्रत्येकी 1 हेक्टर शेतजमीन मंजूर झाली आहे.
महाराष्ट्र दिन भेटीनंतर प्रशासनाची कारवाई
महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार रावल यांनी वीरमाता, वीरपिता आणि वीरपत्नींची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. या भेटीदरम्यान शेतजमिनीचा प्रश्न समोर आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हा प्रशासनाने प्रलंबित प्रस्तावांची छाननी करून पात्र कुटुंबांना जमीन देण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार अरुणा मुंग्या राऊत (रा. वाडीभोकर), माया मनोहर पाटील (रा. न्याहळोद) आणि रुपाली मनोज गायकवाड (रा. चिंचखेडे) या तीन वीरपत्नींना नवलाणे येथे प्रत्येकी 1 हेक्टर शेतजमीन मंजूर करण्यात आली आहे. या प्रक्रियेत नवलाणे येथील सरपंच भिमाभाऊ सूर्यवंशी यांनी सकारात्मक भूमिका दाखवत सामाजिक बांधिलकी जपली, ज्याचे पालकमंत्री रावल यांनी कौतुक केले आहे.
कुटुंबांना मिळणार स्वावलंबनाचा आधार
पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या या वीरपत्नींना हक्काची शेतजमीन मिळाल्यामुळे आर्थिक सुरक्षिततेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. शेतीच्या माध्यमातून या कुटुंबांना भविष्यात स्वावलंबनाचा आधार मिळण्यास मदत होणार आहे. यापूर्वी शहीद सैनिक पंढरीनाथ गबाजी सूर्यवंशी यांच्या मातोश्री वीरमाता इंदुबाई गबाजी सूर्यवंशी यांनाही पालकमंत्री रावल यांच्या हस्ते शेतजमिनीचे दस्तऐवज प्रदान करण्यात आले होते. सैनिकांच्या कुटुंबीयांच्या अडचणींकडे संवेदनशीलतेने लक्ष देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही समाज आणि शासनाची जबाबदारी असल्याचे या संपूर्ण कार्यवाहीतून स्पष्ट झाले आहे.
Source: Cosmo News Desk










