मुंबई | फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या ‘मुंबई क्लायमेट वीक’च्या पूर्वतयारीनिमित्त यशवंतराव चव्हाण केंद्र येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम पर्यावरण क्षेत्रातील जागतिक स्तरावरील ज्ञान, अनुभव आणि पर्यावरणपूरक उपायांच्या देवाणघेवाणीसाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. राज्य शासन या उपक्रमाला पूर्ण सहकार्य करणार असून, पर्यावरण विभाग यामध्ये ज्ञान भागीदार म्हणून सहभागी होणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. या बैठकीला राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सचिव डॉ. राजेश गवांदे, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक शिशिर जोशी यांच्यासह विविध देशांचे महावाणिज्यदूत, उपमहावाणिज्यदूत, कॉन्सुलर कॉर्प्सचे सदस्य आणि प्रोजेक्ट मुंबईचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पर्यावरणीय आव्हाने आणि शाश्वत विकास
पर्यावरणाशी संबंधित आव्हाने ही जागतिक स्वरूपाची असून पृथ्वीचे संरक्षण, महासागर व नद्यांचे प्रदूषण, शहरीकरण, वायुप्रदूषण आणि वाढते तापमान या समस्यांवर सर्व देशांनी एकत्रितपणे परवडणारे उपाय शोधण्याची गरज असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.वाढते उद्योग, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या जीवनशैलीचा पर्यावरणावर परिणाम होत असल्याने पायाभूत सुविधांच्या उभारणीत पर्यावरणीय शाश्वततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. भावी पिढ्यांना शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि सुरक्षित पर्यावरण मिळवून देण्यासाठी केवळ उत्पादनांच्या खरेदी-विक्रीवर नव्हे, तर कल्पना, ज्ञान आणि उपयुक्त तंत्रज्ञानाच्या आदान-प्रदानावर भर देण्यात येईल. युवकांचा सहभाग वाढवून याद्वारे दीर्घकालीन उपाय शोधले जाणार आहेत.
विविध देशांच्या सहभागाचे आवाहन
राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी या बैठकीत विविध देशांना ‘मुंबई क्लायमेट वीक २०२७’ मध्ये सक्रिय भागीदार म्हणून सहभागी होण्याचे आवाहन केले. हवामान बदलाला राष्ट्रीय सीमा नसून वाढते तापमान, पाण्यावरील ताण आणि किनारपट्टीची असुरक्षितता या आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारीची आवश्यकता आहे. हा ‘प्रोजेक्ट मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेचा उपक्रम असून राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका याचे भागीदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन या उपक्रमास संस्थात्मक व राजनैतिक सहकार्य करणार आहे. फेब्रुवारी २०२७ मधील या परिषदेत जगभरातील ११ क्लायमेट वीकचे प्रतिनिधी सहभागी होणार असून मुंबई, लंडन आणि न्यूयॉर्कच्या पुढाकाराने हवामान कृतीचे जागतिक वार्षिक वेळापत्रक तयार करण्यावर भर दिला जाईल, असे प्रोजेक्ट मुंबईचे शिशिर जोशी यांनी सांगितले.
Source: Cosmo News Desk











