Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६: महाराष्ट्राला पाच राष्ट्रीय पुरस्कार
Maharashtra

पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६: महाराष्ट्राला पाच राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली येथील कार्यक्रमात मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना अधिकारी

नवी दिल्ली | प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून नवी दिल्ली येथे आयोजित ‘पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळ्यात राज्याला एकूण पाच राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. पथविक्रेत्यांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्याला दोन, तर छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि परळी या शहरांना प्रत्येकी एक पुरस्कार मिळाला आहे.

राज्याची व शहरांची राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. पुनर्रचित पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज वितरण करण्यात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यामध्ये राज्याने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. कर्ज वितरणाच्या कामगिरीसाठी लोकसंख्येनुसार निश्चित केलेल्या श्रेणींमध्ये शहरांनी विशेष यश मिळवले.

या श्रेणीनुसार, १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात छत्रपती संभाजीनगरने तृतीय क्रमांक मिळवला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त अमोल येडगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच १ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात परभणीने, आणि १ लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात परळीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने निर्धारित २३ हजार ५०२ पथविक्रेत्यांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ४७ हजार ९५० पथविक्रेत्यांना प्रथम कर्ज वितरित करून २०४ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे.

योजनेचा विस्तार आणि सक्षमीकरण

पीएम स्वनिधी योजना १ जून २०२० रोजी सुरू करण्यात आली असून या माध्यमातून देशातील सुमारे ८१ लाख पथविक्रेत्यांना आतापर्यंत १ कोटी २१ लाखांहून अधिक कर्ज वितरण झाले आहे, ज्याची एकूण रक्कम सुमारे २० हजार कोटी रुपये आहे. केंद्र शासनाने ऑगस्ट २०२५ मध्ये या योजनेची पुनर्रचना करून मार्च २०३० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याद्वारे कर्जमर्यादेत वाढ, पात्र लाभार्थ्यांसाठी यूपीआय संलग्न रुपे क्रेडिट कार्ड आणि निमशहरी भागांपर्यंत व्याप्ती वाढविण्याचा समावेश करण्यात आला आहे.

स्वनिधी से समृद्धी उपक्रमांतर्गत पथविक्रेत्यांच्या कुटुंबांना केंद्र शासनाच्या विविध आठ कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जात आहे. सुलभ कर्जपुरवठा, डिजिटल व्यवहार, आर्थिक समावेशन आणि सामाजिक सुरक्षा याद्वारे पथविक्रेत्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम या योजनेतून सुरू आहे. १७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत छत्रपती संभाजीनगर शहरातील ६५ हजार ९१ पथविक्रेत्यांना एकूण १००.०५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित झाले असून ३८ हजार ६९० पथविक्रेते डिजिटल व्यवहारांसाठी सक्रिय झाले आहेत.

Source: Cosmo News Desk

Related Posts