छत्रपती संभाजीनगर | छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि रयतेच्या कल्याणासाठी केलेले कार्य जगासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी केले. सोयगाव नगरपंचायतीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा भूमिपूजन सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे स्मारक प्रेरणास्थान ठरेल, असे विचार मांडण्यात आले.
शिवस्मारकाचे महत्त्व आणि निधी
उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नसून समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना करताना दाखविलेले धैर्य, दूरदृष्टी, शौर्य आणि रयतेप्रती असलेली बांधिलकी आदर्शवत असून महिलांचा सन्मान, सर्वधर्मसमभाव आणि न्यायनिष्ठ राज्यकारभार ही शिकवण नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, सोयगाव तालुक्याची १९५३ मध्ये स्थापना झाल्यापासून स्मारक उभारण्याची मागणी पन्नास वर्षांपासून होत होती. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या प्रस्तावासाठी विशेष लक्ष घालून अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हे स्मारक सोयगावच्या वैभवात भर घालण्यासोबतच अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल.
शेतकरी कुटुंबांना शासकीय मदत
या कार्यक्रमादरम्यान सोयगाव तालुक्यातील चार शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपयांची शासकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली. तसेच या कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, कुटुंबातील मुलीला शिक्षणासाठी सायकल आणि जीवनावश्यक किराणा साहित्य देऊन मदत करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत जोशी आणि ॲड. योगेश पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रभाकर काळे यांनी केले तर संतोष बोडखे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास विविध मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk











