मुंबई | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत १४० प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी ५९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के हिस्सा म्हणून ३५ कोटी ४० लाख रुपये आणि राज्य शासनाचा ४० टक्के हिस्सा म्हणून २३ कोटी ६० लाख रुपयांचा समावेश आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षातील मंजूर तरतुदीतून हा सर्व खर्च केला जाणार आहे.
प्रकल्पांचे स्वरूप आणि व्याप्ती
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ३० जिल्ह्यांतील १ हजार ५२० गावांमध्ये ५.२६ लाख हेक्टर क्षेत्रावर पाणलोट विकासाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या सर्व प्रकल्पांची एकूण किंमत १ हजार २५१ कोटी ११ लाख रुपये असून, यात केंद्र व राज्याचा हिस्सा अनुक्रमे ६० आणि ४० टक्के आहे. यापूर्वी योजनेच्या सर्वसाधारण घटकासाठी केंद्र हिश्श्याचे १०४ कोटी ४६ लाख रुपये आणि राज्य हिश्श्याचे ६९ कोटी ६३ लाख ९९ हजार रुपये, असा एकूण १७४ कोटी ९ लाख ९९ हजार रुपयांचा निधी यापूर्वीच वितरित करण्यात आला आहे.
निधी वितरणाची यंत्रणा आणि अटी
केंद्र शासनाने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अतिरिक्त ३५ कोटी ४० लाख रुपयांच्या केंद्र हिश्श्याला तिसरी मातृ मंजुरी दिल्यानंतर राज्य शासनाने समरूप राज्य हिश्श्यासह हा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. या निधीच्या आहरण व वितरणासाठी पुणे येथील वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेच्या अपर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहरण व संवितरण अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी हा निधी ‘एसएनए-स्पर्श’ प्रणालीवर तातडीने कार्यान्वित करावा, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
हा निधी खर्च करताना केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना, प्रचलित आर्थिक निकष आणि सर्व अटी-शर्तींचे पालन करणे बंधनकारक आहे. या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे सर्व आवश्यक माहितीसह निश्चित कालावधीत केंद्र व राज्य शासनाकडे सादर करण्याची संपूर्ण जबाबदारी वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील १७ नोव्हेंबर २०२६ रोजीचा शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Source: Cosmo News Desk










