नाशिक | सटाणा तालुक्यातील जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी वनविभातर्फे उभारण्यात आलेले निसर्ग परिचय केंद्र सद्यस्थितीत देखभाल-दुरुस्तीअभावी पूर्णपणे भग्नावस्थेत आले आहे. पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरलेल्या या केंद्रातील वन्यप्राण्यांची शिल्पे तुटली असून, इमारतीचे दरवाजे आणि खोल्यांची देखील अत्यंत दुरवस्था झाली आहे. वनविभागाच्या या दुर्लक्षामुळे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वापूर्ण असलेली ही वास्तू सध्या अखेरच्या घटका मोजत असल्याचे विदारक चित्र साल्हेर परिसरात पाहायला मिळत आहे.
निसर्ग परिचय केंद्राची स्थापना आणि उद्दिष्ट
सन २०१५ मध्ये तत्कालीन उपविभागीय वनाधिकारी सुरेश दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी या निसर्ग परिचय केंद्र व अतिथीगृहाची उभारणी करण्यात आली होती. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील वन्यप्राणी, जैवविविधता आणि ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याची सविस्तर माहिती पर्यटकांना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, हा यामागील मुख्य उद्देश होता. या केंद्रात वन्यप्राण्यांची आकर्षक शिल्पे, माहितीपट, डिजिटल फ्रेम्स आणि माहिती फलकांची सुंदर मांडणी करण्यात आली होती. त्यामुळे किल्ल्याला भेट देण्यासाठी येणारे पर्यटक या केंद्राला नक्की भेट देत असत आणि विशेषतः लहान मुलांसाठी येथील वन्यप्राण्यांची शिल्पे विशेष आकर्षणाचा विषय ठरली होती. मात्र, कालांतराने या केंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे या संपूर्ण वास्तूची रयाच निघून गेली आहे.
खोल्यांची दुरवस्था आणि पुनरुज्जीवनाची मागणी
सध्या या केंद्रातील अनेक शिल्पे तुटलेल्या स्थितीत असून ती एकाच खोलीत टाकण्यात आली आहेत. इमारतीच्या अनेक खोल्यांची दुरवस्था झाली असून त्यांचे दरवाजे देखील पूर्णपणे तुटले आहेत. या खोल्या उघड्या आणि असुरक्षित असल्याने त्यांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने या इमारतीची तातडीने दुरुस्ती करावी आणि सुरक्षेच्या योग्य उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी पर्यटकांकडून केली जात आहे. दरम्यान, याविषयी बोलताना ताहाराबादचे वन परिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शर्माळे यांनी सांगितले की, यापूर्वी या केंद्राच्या दुरुस्तीसाठी कोणताही प्रस्ताव पाठविण्यात आला नव्हता किंवा तशी कोणतीही मागणी करण्यात आली नव्हती. आता मात्र केंद्राच्या दुरुस्तीसाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठविण्यात येत असून तो लवकरात लवकर मंजूर व्हावा यासाठी निश्चितपणे योग्य तो पाठपुरावा केला जाईल.
Source: Cosmo News Desk









