पंढरपूर | कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना उत्तम, स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार आणि पंढरपूर नगरपालिकेने सर्वंकष नियोजन केले आहे. यात्रेच्या संपूर्ण व्यवस्थापनासाठी नगरपालिकेला पाच कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते आणि निवास व्यवस्थेसाठी आधुनिक यंत्रणा व आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कार्तिकी वारीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूर येथे पाहणी केली.
आरोग्य, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था
यात्रेदरम्यान येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आली असून विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे उभारण्यात आली आहेत. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची पाहणी करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा घेतला. वारकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध मिनरल वॉटर मिळावे आणि स्नानासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ठिकठिकाणी वॉटर प्युरिफायर यंत्रणा व बदलत्या कपड्यांच्या खोल्या बसवण्यात आल्या आहेत. शौचालये आणि स्नानगृहांची दिवसातून चार ते पाच वेळा स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले असून, चंद्रभागा परिसरातील स्वच्छतागृहांची व नव्याने विकसित केलेल्या घाटांची पाहणी करण्यात आली. दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांसाठी पंखे, कुलर आणि बसण्याची सोय केली जात आहे. रेल्वे परिसरातील सुमारे ६५ एकर जागेचाही नियोजनासाठी वापर केला जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून चंद्रभागेच्या पायऱ्यांची स्वच्छता
पंढरपुरात विविध सुविधांचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रभागेच्या तीरावर पोहोचले. तिथे प्रशासनाकडून पाईपद्वारे पायऱ्यांची स्वच्छता केली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या हातातील पाईप स्वतः घेऊन चंद्रभागेच्या तीरावरील पायऱ्यांची स्वच्छता केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान माजी आमदार शहाजीबापू पाटील, आमदार अभिजित पाटील, आमदार राजू खरे, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, संपर्क प्रमुख महेश नाना साठे, पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यात्रेत कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाला कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
Source: Cosmo News Desk











